सुवेंदू अधिकारी आज घेणार शपथ 
राष्ट्रीय

सुवेंदू अधिकारी आज घेणार शपथ

पश्चिम बंगालच्या राजकारणात शुक्रवारी एका ऐतिहासिक पर्वाची सुरुवात झाली. पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना निवडणुकीत सलग दोनदा पराभूत करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते सुवेंदू अधिकारी यांची शुक्रवारी भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

Swapnil S

कोलकाता : पश्चिम बंगालच्या राजकारणात शुक्रवारी एका ऐतिहासिक पर्वाची सुरुवात झाली. पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना निवडणुकीत सलग दोनदा पराभूत करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते सुवेंदू अधिकारी यांची शुक्रवारी भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे सुवेंदू अधिकारी यांचा पश्चिम बंगालचे भाजपचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अधिकारी यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली. नवनिर्वाचित आमदार आणि पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला.

नव्या भाजप सरकारचा शपथविधी सोहळा शनिवार, ९ मे रोजी कोलकाता येथील ऐतिहासिक ब्रिगेड परेड ग्राऊंडवर पार पडणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती पक्षीय सूत्रांनी दिली आहे.

ममतांच्या सत्तेचा अंत

विधानसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर आता राज्यात पहिल्यांदाच भाजपचे सरकार स्थापन होत आहे. या विजयामुळे तृणमूल काँग्रेसची राज्यातील १५ वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे. सुवेंदू अधिकारी हे एकेकाळी ममता बॅनर्जींचे अत्यंत विश्वासू सहकारी होते. डिसेंबर २०२० मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. महत्त्वाची भूमिका: बंगालमध्ये भाजपचा संघटनात्मक विस्तार करण्यात आणि प्रचारात त्यांनी केंद्रबिंदू म्हणून काम केले.

ऐतिहासिक विजय: २०२१ च्या निवडणुकीत त्यांनी नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींचा पराभव करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आता २०२६ च्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा एकदा भवानीपूर मतदारसंघातून ममता बॅनर्जींचा पराभव करत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर आमदारांना संबोधित करताना अधिकारी म्हणाले की, बंगालमधील भीतीचे वातावरण आता संपले असून राज्य आता 'विश्वासाच्या' युगाकडे वाटचाल करेल. राज्यातून 'भय' आता बाहेर गेले असून, नरेंद्र मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे 'भरोसा' परतला आहे, असे अधिकारी यांनी सांगताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

आता घुसखोरी, गोवंश तस्करीला थारा नाही; अमित शहा

पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यात घुसखोरी आणि गोवंश तस्करी पूर्णपणे थांबवली जाईल, असा ठाम विश्वास अमित शहा यांनी शुक्रवारी व्यक्त केला. कोलकाता येथे आयोजित भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत शहा यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. बंगालमधील हा विजय केवळ पक्षाचा विस्तार किंवा विचारधारेचा विजय नसून, तो राष्ट्रीय सुरक्षा आणि लोकशाहीच्या पुनर्स्थापनेशी जोडलेला जनादेश असल्याचे त्यांनी नमूद केले.

राष्ट्रीय सुरक्षेसाठी ऐतिहासिक विजय

शहा म्हणाले की, हा विजय केवळ संघटनेच्या विस्तारापुरता मर्यादित नाही, तर देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेतील सर्वात मोठी त्रुटी भरून काढणारा आहे. आता पश्चिम बंगालमध्ये घुसखोरी आणि गायींची तस्करी करणे अशक्य होईल. बंगालमधील दहशतीच्या वातावरणातही भाजपला पाठिंबा दिल्याबद्दल शहा यांनी जनतेचे आभार मानले.

Pune : प्रियकरासोबत मिळून होणाऱ्या नवऱ्याचा काटा काढला? दरीत ढकलून अपघाताचा बनाव; तपासात समोर आले धक्कादायक खुलासे

केंद्राच्या तात्पुरत्या बंदीनंतर प्ले स्टोअरवर Telegram पुन्हा सुरू; पण ॲप स्टोअरवरून अजूनही गायब

Delhi Crime : फुटपाथवर झोपलेल्या ११ वर्षीय मुलीचे अपहरण; लैंगिक अत्याचारानंतर हत्या, कॅब चालक जेरबंद!

Mumbai : ‘ओसी’ नसलेल्या इमारतींना दिलासा; ८०० चौरस फुटांपर्यंत सदनिका असलेल्या इमारतींना मिळणार OC, राज्य सरकारची मंजुरी

Lucknow Fire : लग्नाचं स्वप्न झालं भस्मसात! जिथे प्रेम फुललं, तिथेच जोडप्याचा अंत, लखनऊ अग्निकांडमधील मन सुन्न करणारी घटना