कोलकाता: पश्चिम बंगालच्या राजकीय इतिहासात शनिवारी एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली. भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी शनिवारी बंगालचे पहिले भाजप मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ऐतिहासिक ब्रिगेड परेड ग्राऊंडवर हजारो समर्थकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बंगालमध्ये भाजपचे सरकार स्थापन झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे केंद्रीय नेतृत्व आणि एनडीएशासित राज्यांचे मुख्यमंत्री या सोहळ्याला उपस्थित होते. राज्यपाल आर. एन. रवी यांनी सुवेंदू अधिकारी यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळी संपूर्ण मैदान 'जय श्री राम'च्या घोषणांनी आणि शंखनादाने दुमदुमून गेले होते. व्यासपीठावर आगमन होताच मोदींनी जनतेच्या कौलाचा आदर करत मंचावर जनतेसमोर नतमस्तक होऊन वंदन केले, ज्याला उपस्थित जनसमुदायाने प्रचंड प्रतिसाद दिला.
सुवेंदू अधिकारी यांच्यानंतर माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत अग्निमित्रा पॉल, अशोक कीर्तनिया, क्षुदिराम तुडू, निशिथ प्रामाणिक यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या सहा सदस्यीय मंत्रिमंडळात भाजपने ब्राह्मण, ओबीसी, आदिवासी, मतुआ आणि राजबंशी समुदायांना स्थान देऊन सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे.
सुवेंदु अधिकारी ब्राह्मण आहेत, तर दिलीप घोष ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. उत्तर बंगालमधून दोन आणि दक्षिण बंगालमधून तीन मंत्र्यांचा समावेश करून प्रादेशिक समतोलही राखला गेला आहे. विशेष म्हणजे, पहिल्या यादीत कोलकाता शहरातून एकाही प्रतिनिधीला स्थान मिळालेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळातील उर्वरित मंत्र्यांचा शपथविधी सोमवारी राजभवनात पार पडण्याची शक्यता आहे. त्याच दिवशी नवीन मंत्रिमंडळाची पहिली बैठकही होऊ शकते. मंत्र्यांच्या खात्यांचे वाटप अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.
माखनलाल यांचा गौरव
पंतप्रधानांनी मंचावर उपस्थित असलेले ९८ वर्षीय भाजप कार्यकर्ते माखनलाल सरकार यांचा सन्मान केला. मंचावर आल्यावर पंतप्रधान थेट सरकार यांच्याकडे गेले, त्यांना शाल पांघरली आणि नंतर त्यांच्या पायांना स्पर्श केला. माखनलाल यांना १९५२ च्या काश्मीर आंदोलनादरम्यान अटक करण्यात आली होती, तेव्हा ते श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्यासोबत तिरंगा फडक वण्यासाठी गेले होते. मोदींनी मंचावर गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या १६५ व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. बंगाली कॅलेंडरनुसार, पोचिसे बोइशाखच्या दिवशी गुरुदेवांची १६५ वी जयंती आहे. पंतप्रधानांनी व्यासपीठावर त्यांच्या प्रतिमेला फुले अर्पण केली. मोदींनी मैदानातील प्रवेशद्वारापासून मंचापर्यंत रोड शो केला.