नवी दिल्ली : तुमच्या तणावाचे कारण ओळखा आणि ते विश्वासू व्यक्तीशी व्यक्त करा, असा सल्ला बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात त्यांनी मानसिक आरोग्य, तणाव व्यवस्थापन आणि परीक्षेच्या काळात शांत राहण्याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
"स्पर्धा आणि तुलना हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. स्पर्धा वाईट नाही, परंतु आपली ताकद आणि दुर्बलता ओळखून, आपल्या ताकदीवर भर देत आणि दुर्बलता सुधारत पुढे जाणे गरजेचे आहे," असा मोलाचा सल्ला पदुकोण यांनी दिला. त्या पुढे म्हणाल्या, "तणाव व्यवस्थापनासाठी परीक्षेच्या आदल्या रात्री पालकांशी बोला. तुमच्या तणावाचे कारण शोधा आणि विश्वासू व्यक्तीशी व्यक्त व्हा."
दीपिका पदुकोण यांनी २०१५ मध्ये आपल्या नैराश्याबद्दल खुलेपणाने बोलण्यास सुरुवात केली. त्या म्हणाल्या, "पूर्वी मानसिक आरोग्याविषयी बोलणे आपल्या समाजात सहज मान्य केले जात नव्हते. पण मी जेव्हा याबद्दल बोलायला लागले, तेव्हा मला खूप हलके वाटले आणि मी मानसिक आरोग्य जागरूकतेच्या दिशेने वाटचाल सुरू केली. नैराश्य, चिंता आणि तणाव कोणालाही, कधीही होऊ शकतो. म्हणूनच 'व्यक्त व्हा, मनात कोणतेही दडपण ठेवू नका'. कारण, २०१४ मध्ये सतत कामाच्या तणावामुळे मी कोसळले. तेव्हा माझ्या आईने त्यांच्या मानसिक स्थितीची जाणीव ठेवून लगेचच मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचा निर्णय घेतला होता.
याआधी बॉक्सर एमसी मेरी कोम, आध्यात्मिक गुरू सद्गुरू यांनीही विद्यार्थ्यांना जीवन आणि शिक्षणातील महत्त्वाच्या पैलूंवर मार्गदर्शन केले आहे. पुढच्या भागात प्रसिद्ध यूट्यूबर गौरव चौधरी आणि एडलवाईस म्युच्युअल फंडच्या MD आणि CEO राधिका गुप्ता विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. या सत्रात परीक्षेच्या काळातील गॅझेट्सचा वापर, वेळेचे व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा अभ्यासात योग्य वापर यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल.