तमिळनाडूमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्या; ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य EVMमध्ये बंद होणार, ४ मे रोजी निवडणुकीचा निकाल संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

तमिळनाडूमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्या; ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य EVMमध्ये बंद होणार, ४ मे रोजी निवडणुकीचा निकाल

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठीचा महिनाभर चाललेला जोरदार प्रचार मंगळवारी सायंकाळी ६ वाजता संपला. मतदानाच्या ४८ तास आधी 'सायलेंट पिरियड' म्हणजेच शांतता काळ सुरू झाला आहे.

Swapnil S

चेन्नई: तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठीचा महिनाभर चाललेला जोरदार प्रचार मंगळवारी सायंकाळी ६ वाजता संपला. मतदानाच्या ४८ तास आधी 'सायलेंट पिरियड' म्हणजेच शांतता काळ सुरू झाला आहे. या काळात राजकीय पक्ष आणि उमेदवारांना सभा, मिरवणुका किंवा प्रचाराशी संबंधित जाहिराती प्रसिद्ध करण्यास बंदी घालण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून लागू झालेली आचारसंहिता निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लागू राहणार आहे. येत्या २३ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाची मोजणी ४ मे रोजी होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील संवेदनशील ठिकाणांवरील पोलीस बंदोबस्त कडक करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी कोलाथूर मतदारसंघात मतदारांशी संवाद साधून प्रचाराचा समारोप केला. तमिळनाडूचा विश्वासघात करणाऱ्यांना आणि राज्याच्या विकासात अडथळा आणणाऱ्यांना आपण 'धोका' ठरू, असे स्टालिन यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे.

केंद्र सरकारकडून होत असलेली मतदारसंघांची पुनर्रचना तमिळनाडूसारख्या चांगली कामगिरी करणाऱ्या राज्यांना शिक्षा देण्यासारखी आहे, असा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, 'द्रमुक'च्या उपसरचिटणीस आणि खासदार कणिमोझी यांनी तुतुकोरिनमध्ये पक्षाच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.

'अण्णा द्रमुक'चे सरचिटणीस एडप्पाडी के. पलानीस्वामी यांनी पश्चिम तमिळनाडूमध्ये प्रचाराची सांगता करताना 'द्रमुक'चे भ्रष्ट सरकार आणि घराणेशाही संपवण्याचे आवाहन जनतेला केले. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी विविध पक्षांसाठी प्रचार केला.

विकास, घराणेशाही आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांसह मतदारसंघांची पुनर्रचना हा मुद्दा प्रचारात कळीचा ठरला आहे. यंदाच्या निवडणुकीत स्टालिन यांच्या नेतृत्वाखालील 'सेक्युलर प्रोग्रेसिव्ह अलायन्स' आणि पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखालील 'राष्ट्रीय लोकशाही आघाडी' (एनडीए) यांच्यात मुख्य लढत आहे. 'द्रमुक' १६४ जागांवर, तर 'अण्णा द्रमुक' १६९ जागांवर निवडणूक लढवत आहे.

तमिळनाडूत यंदा चौरंगी लढत

यंदाच्या निवडणुकीत अभिनेता विजय यांच्या 'तमिळगा वेत्री कळघम' या पक्षाने सर्व जागांवर उमेदवार उभे केल्याने चौरंगी लढत होत आहे. 'द्रमुक'ने विजय यांच्या विरोधात अभिनेता कमल हासन यांना प्रचारात उतरवले आहे. तसेच दिग्दर्शक सीमन यांचा 'नाम तमिळार कच्ची' हा पक्षही सर्व २३४ जागांवर निवडणूक लढवत आहे. या निवडणुकीत एकूण ४,०२३ उमेदवार रिंगणात असून ५,७३,४३,२९१ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

Thane : सर्व्हिस सेंटरमध्ये १० जूनपर्यंत वाहने धुण्यावर निर्बंध; पाणीटंचाई टाळण्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

विश्रांती कक्षाचा वापर धार्मिक विधींसाठी पुण्यातील बहुराष्ट्रीय कंपनीची चौकशी करण्याचे निर्देश

अयान अहमद आईचे दागिने विकून करायचा शौक; अमरावती लैंगिक शोषणप्रकरणी धक्कादायक खुलासा

जाॅन टर्नसच्या हाती ॲपल! टीम कूक लवकरच सोडणार कंपनीचे मुख्याधिकारीपद

मुंबईकरांचा प्रवास होणार अधिक सुखकर; बेस्ट ५०० मिडी बसेस भाडेतत्त्वावर घेणार