पश्चिम बंगालमध्ये मोठी दुर्घटना! पहाटे गाढ झोपेत असतानाच हॉटेलला भीषण आग; ७ जणांचा करूण अंत, अनेकजण गंभीर, VIDEO 
राष्ट्रीय

पश्चिम बंगालमध्ये मोठी दुर्घटना! पहाटे गाढ झोपेत असतानाच हॉटेलला भीषण आग; ७ जणांचा करूण अंत, अनेकजण गंभीर, VIDEO

अचानक संपूर्ण हॉटेलमध्ये धूर पसरला. श्वास घेणंही कठीण झालं होतं आणि बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधणं अवघड झालं...

Mayuri Gawade

पश्चिम बंगालच्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्र तारापीठमध्ये सोमवारी (दि.१७) पहाटे मोठी दुर्घटना घडली. येथील एका चार मजली हॉटेलला अचानक आग लागल्याने किमान ७ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. आगीच्या वेळी हॉटेलमधील बहुतांश लोक झोपेत असल्याने बचावासाठी मोठी धावपळ उडाली.

पहाटे ५ वाजता हॉटेलमध्ये आग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे सुमारे ४:३० ते ५ वाजण्याच्या सुमारास चार मजली हॉटेलच्या तळमजल्यावर अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात धूर पसरला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली. हॉटेलमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे बचावकार्यही करण्यात आले.

जखमींवर रुग्णालयात उपचार

आगीत जखमी झालेल्यांना उपचारासाठी रामपूरहाट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतर पोलिसांनी मृतांचा आकडा ७ वर पोहोचल्याचे स्पष्ट केले.

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा दावा

हॉटेल प्रशासनाने प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा दावा केला आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, हॉटेलमधील अग्निसुरक्षा व्यवस्थेचीही पाहणी केली जात आहे.

'हॉटेलमध्ये सर्वत्र धूर पसरला'

या आगीतून बचावलेल्या कोलकात्यातील एका महिलेने हॉटेलमधील भयावह परिस्थिती सांगितली. "अचानक संपूर्ण हॉटेलमध्ये धूर पसरला. श्वास घेणंही कठीण झालं होतं आणि बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधणं अवघड झालं," असे तिने सांगितले.

दरम्यान, मृतांमध्ये तारापीठमधील प्रसिद्ध काली मंदिरात दर्शनासाठी आलेल्या काही भाविकांचाही समावेश असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. दुर्घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, आगीचे नेमके कारण आणि सुरक्षेतील त्रुटींचा तपास केला जात आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Bihar : श्रावणी सोमवारी मोठी दुर्घटना! अशोकधाम मंदिरात चेंगराचेंगरी; ७ महिला भाविकांचा मृत्यू, अनेक जखमी; VIDEO

Mumbai : बाप्पाच्या विसर्जनापूर्वी खड्डेमुक्त रस्ते होणार; महापौरांचे समन्वय समितीला आश्वासन

तरुणाने डायव्हिंगमध्ये रचले दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड; संभाजीनगरच्या रतीश कुलकर्णी यांची प्रेरणादायी कामगिरी

वाहतूककोंडीवर ‘स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट’चा पायलट प्रोजेक्ट; गुगल मॅप्सवर कोंडी दिसताच उल्हासनगर वाहतूक पोलिसांची घटनास्थळी धाव

वसईत आजपासून तीन वाढीव न्यायालये कार्यान्वित; आणखी पाच-सहा कंटेनर कोर्ट सुरू करण्यासाठी प्रयत्न