नवी दिल्ली : मी भोगासाठी नव्हे, तर देशहितासाठी तिसऱ्यांदा सत्ता मागत आहे. विरोधक मतदारांना आकर्षित करण्यासाठी खोटी आश्वासने देत आहेत. पण त्यांच्याकडे विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी कोणतीही ठोस योजना नाही. भारतीय जनता पक्षातच विकसित भारत घडवण्याची पात्रता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच बहुमताने विजयी होणार, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिली. नवी दिल्लीत पार पडलेल्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोप समारंभात मोदी बोलत होते. राजधानीतील भारत मंडपम येथे झालेल्या या कार्यक्रमात मोदी यांनी देशभरातून उपस्थित राहिलेल्या सुमारे ११,५०० भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना ६५ मिनिटे संबोधित केले. देशवासीयांच्या आशा-आकांक्षा उंचावल्या आहेत. देश आता मोठी स्वप्ने पाहत आहे. २०४७ सालापर्यंत भारताला विकसित देशांच्या पंक्तीत नेऊन बसवण्याचा आम्ही निर्धार केला आहे. त्यासाठी पुन्हा भाजपला निवडून आणणे, ही पूर्वअट आहे. विजय सुनिश्चित करण्यासाठी येत्या १०० दिवसांत आपल्याला नवा उत्साह, ऊर्जा आणि जोमाने कामाला लागले पाहिजे. पुढील पाच वर्षे महत्त्वाची आहेत. मला स्वत:च्या फायद्यासाठी सत्ता नको आहे. देशहिताचे स्वप्न साकार करण्यासाठी सत्ता हवी आहे, अशा शब्दांत मोदी यांनी एप्रिल-मे महिन्यात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात नवा उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
आंतरराष्ट्रीय मंचावर भारताची पत वाढत आहे. पुढील काही महिन्यांत अनेक देशांनी मला भेट देण्यासाठी आमंत्रित केले आहे. पश्चिम आशियातील देशांबरोबर भारताचे संबंध आता सर्वाधिक दृढ झाले आहेत. काँग्रेसने या भूप्रदेशाकडे कायम पाकिस्तानच्या चष्म्यातूनच पाहिले होते. पण आता ५ अरब देशांनी मला त्यांचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरवित केले आहे. विविध देश आता भारताकडे मोठ्या अपेक्षेने आणि विश्वासाने पाहत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजपच निवडून येणार याचे ते द्योतक आहे, असेही मोदी यांनी सांगितले.
राम मंदिरासंबंधी ठराव संमत
भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात अयोध्येतील राम मंदिरासंबंधी ठराव संमत करण्यात आला. अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीमुळे देशात पुढील १००० वर्षांसाठी रामराज्याची पायाभरणी केली गेली आहे, असे त्यात म्हटले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा
मला छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा मिळाली आहे. शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शांनुसार मी जीवन व्यतित करण्याचा प्रयत्न करत आहे. स्वत:च्या आनंदासाठी जगणाऱ्यांपैकी मी नव्हे. मी राजकीय लाभासाठी तिसऱ्या वेळी सत्ता मागत नसून देशाच्या हितासाठी मागत आहे. माझे सर्व प्रयत्न देशवासींच्या हितासाठी समर्पित आहेत, असे यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आता निवडणूक नाही
आता भाजपमध्ये राष्ट्रीय अध्यक्षांसाठी निवडणुकीची गरज नाही. हे पद रिक्त झाल्यास संसदीय मंडळ सभापतींची नियुक्ती करू शकेल. भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. हा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ जून २०२४ पर्यंत वाढवण्यात आला आहे. जे. पी. नड्डा जून २०१९ मध्ये पक्षाचे कार्याध्यक्ष बनले. यानंतर त्यांना २० जानेवारी २०२० रोजी पूर्णवेळ अध्यक्ष बनवण्यात आले.