एक्स @NitishKumar
राष्ट्रीय

जंगलराज चालवणारे महाकुंभला शिव्या देताहेत; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका

जंगलराज चालवणारे महाकुंभला शिव्या देत आहेत. राम मंदिरावर संतापणारे लोक महाकुंभची बदनामी करण्यात आघाडीवर आहेत.

Swapnil S

भागलपूर : जंगलराज चालवणारे महाकुंभला शिव्या देत आहेत. राम मंदिरावर संतापणारे लोक महाकुंभची बदनामी करण्यात आघाडीवर आहेत. महाकुंभवर टीका करणाऱ्यांना बिहार कधीच माफ करणार नाही, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

भागलपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीच्या १९ व्या हप्त्याचे वितरण केले. तसेच विविध विकास योजनांचे उद्घाटन केले.

ते पुढे म्हणाले की, महाकुंभच्या काळात भागलपूरमध्ये येणे हे सौभाग्याचे लक्षण आहे. कारण या जागेत श्रद्धा व परंपरा आहे. ही जागा तिलकामांझीची असून सिल्कचे शहरही आहे. बाबा अजगैबीनाथ या जागेवर महाशिवरात्रीची तयारी सुरू आहे. या काळात पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना पाठवण्याचे भाग्य मला मिळाले आहे, असे मोदी यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, विकसित भारताचे चार स्तंभ आहेत. त्यात गरीब, महिला, तरुण व शेतकरी. आमचे सरकार केंद्रात असो किंवा राज्यात. शेतकऱ्यांच्या कल्याणाला आमची प्राथमिकता आहे, असे मोदी म्हणाले.

लालूप्रसाद यादव यांच्यावर टीका करताना मोदी म्हणाले की, पूर्वी शेतकरी कायम संकटात असायचा. जे लोक जनावरांचा चारा खायचे ते परिस्थिती बदलू शकत नाहीत. रालोआ सरकारने परिस्थिती बदलली. गेल्या काही वर्षांत अनेक आधुनिक बियाणी शेतकऱ्यांना दिली. पूर्वी युरिया मिळवण्यासाठी शेतकरी मार खात होता. कारण त्यावेळी युरियाचा काळाबाजार चालत होता. आता शेतकऱ्यांना पुरेल इतका युरिया मिळतो, असे त्यांनी सांगितले.

कोरोना काळात शेतकऱ्यांनी पीक कमी होऊ दिले नाही. रालोआ सरकार नसते तर काय झाले असते? युरियाचे एक पोते तीन हजार रुपयांना मिळाले असते? खतांसाठी शेतकऱ्यांना लाठ्या खाव्या लागल्या असत्या, असे मोदी म्हणाले.

शेतकऱ्यांच्या खात्यात १९ वा हप्ता जमा

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा १९ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. पंतप्रधान मोदी यांनी ९.८ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २२ हजार कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत.

लठ्ठपणाविरोधातील मोहिमेत १० नामवंतांची निवड

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी देशातील लठ्ठपणाच्या समस्येवर मात करण्यासाठी राजकारण, क्रीडा, उद्योग आणि मनोरंजन क्षेत्रातील १० मान्यवरांची निवड केली आहे. लठ्ठपणा आणि अतिरिक्त वजनामुळे अनेक प्रकारच्या समस्या आणि आजार उद्भवतात. आपण सगळे मिळून थोडी मेहनत केल्यास या समस्येचा सामना करू शकतो. यात एक पर्याय मी सुचवला की रोजच्या जेवणातला खाद्यतेलाचा वापर १० टक्क्यांनी कमी करा. तुम्ही तेल खरेदी करतानाच १० टक्के कमी तेल खरेदी करून हे साध्य करू शकता, असे मोदी म्हणाले.

आनंद महिंद्रा - उद्योगपती, दिनेश लाल यादव उर्फ निरुहा - भोजपुरी अभिनेते-राजकीय नेते, मनू भाकर- ऑलिम्पिक नेमबाज, मीराबाई चानू - ऑलिम्पिक वेटलिफ्टर, मोहनलाल - अभिनेते व चित्रपट निर्माते, नंदन निलेकणी - इन्फोसिस सहसंस्थापक, ओमर अब्दुल्ला - जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री, माधवन - अभिनेते, श्रेया घोषाल - गायिका, सुधा मूर्ती - राज्यसभा खासदार आदींचा समावेश आहे.

शेतकऱ्यांना ३ हजार वाढविणार - मुख्यमंत्री

नागपूर : शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा फायदा होत आहे. राज्य शासनही केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना ‘नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत’ ६ हजार रुपये देत असून लवकरच हे अर्थसहाय्य ३ हजार रुपयांनी वाढविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक