जबलपूर : जग आता तिसऱ्या महायुद्धाच्या छायेत आहे. त्यामुळे संपूर्ण जग शांततेसाठी भारताकडे पाहत आहे. मात्र यात काही लोक अडवणुकीचा प्रयत्न करत आहेत, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. भारत हा विश्वगुरू बनण्याच्या दिशेने निघाला आहे, असेही ते म्हणाले.
जबलपूर येथे झालेल्या कार्यक्रमात ते म्हणाले की, युक्रेन-रशिया व इस्रायल-हमास युद्धामुळे जगावर तिसऱ्या महायुद्धाची छाया पसरली आहे. हे तिसरे महायुद्ध इस्रायल किंवा युक्रेनमधून सुरू होईल हे निश्चित कळत नाही. जगात विज्ञानाने मोठी प्रगती केली. पण, याचे फायदे अजूनही गरीबांपर्यंत पोहचलेले नाहीत. जगाला उद्ध्वस्त करणारी शस्त्रास्त्रे जगाच्या प्रत्येक भागात पोहचवली जात आहेत. काही आजारांची औषधे ग्रामीण भागात पोहचत नाहीत. मात्र, बंदुक या भागात पोहचतेच, असे ते म्हणाले.
हिंदुत्वात जगाला मार्ग दाखवण्याचे सामर्थ्य
पर्यावरणाची हानी वाढली आहे. त्यामुळे आजारपण वाढत आहे. मानवतेची सेवा करणे हाच सनातन धर्म आहे. हेच हिंदुत्वामध्ये होते. जगाला मार्ग दाखवण्याचे सामर्थ्य हिंदुत्वात आहे. भारतीय ग्रंथात लिखाणापूर्वी ‘हिंदू’ हा शब्द अस्तित्वात आला. जनतेसमोर या शब्दाचा पहिला प्रयोग गुरुनानक देव यांनी केला होता, असे ते म्हणाले.