राष्ट्रीय

जगभरात दहशतवाद्यांकडून ड्रोन हल्ल्यांचा धोका; एस. जयशंकर यांनी व्यक्त केली चिंता

वृत्तसंस्था

नवी दिल्ली येथे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीच्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी जगभर होणाऱ्या ड्रोन हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली. “ड्रोन हल्ले हा जगासाठी मोठा धोका बनत असून ड्रोनची किंमत खूपच कमी असल्याने तसेच ते सहज उपलब्ध होत असल्याने ड्रोनद्वारे होणारे हल्ले वाढण्याची भीती अधिक आहे,” असे जयशंकर यांनी सांगितले.

“एखाद्या समाजाला अस्थिर करण्यासाठी दहशतवाद्यांचे गट इंटरनेटचा वापर करत आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे धर्मांधता आणि षडयंत्र सिद्धांत पसरवण्यासाठी एक टूलकिट बनले आहेत. तंत्रज्ञान सर्वांना सहज उपलब्ध आहे. त्यामुळे दहशतवाद्यांची क्षमताही वाढली आहे. याचा वापर करून ते अगदी सहज हल्ले करत आहेत,” असे जयशंकर म्हणाले.

दहशतवादाचा सामना करण्यासाठी युनायटेड नेशन्स ट्रस्ट फंडला भारताकडून सुमारे ४ कोटी रुपयांची मदत केली जाणार आहे. “दहशतवादाचा सामना करणे हे सुरक्षा परिषदेचे प्राधान्य आहे. संयुक्त राष्ट्रांचे सदस्य आणि भागधारक दहशतवादाचा नायनाट करू शकतात, हे दिल्लीत रंगणाऱ्या या बैठकीतील उपस्थितीवरून लक्षात येते. मात्र तरीही जगापुढील दहशतवादाचा धोका वाढत आहे. दहशतवादाचा सर्वात मोठा धोका आशिया आणि आफ्रिकेत आहे,” अशी माहितीही जयशंकर यांनी दिली.

सोशल मीडियाचा वापर

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीची दोन दिवसीय बैठक शनिवारी दिल्लीत संपली. या बैठकीत सहभागी झालेल्या १५ देशांच्या प्रतिनिधींचे दहशतवादाचा मुकाबला तंत्रज्ञानाच्या वापरानेच करण्यावर एकमत झाले. दहशतवादी कारवायांसाठी होत असलेल्या इंटरनेट आणि संवाद माध्यमांसह समाज माध्यमांच्या वाढत्या वापरावर चिंता व्यक्त करण्यात आली. दहशतवादाला होत असलेला निधी पुरवठा रोखण्यासाठी ठोस उपाय करण्यावर या परिषदेत भर देण्यात आला. छोट्या-मोठ्या दहशतवादी कारवायांपासून मोठ्या कारवायांपर्यंत दहशतवाद रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वतोपरी उपाय करण्यावर भर देण्याचा निर्णयही या परिषदेत घेण्यात आला.

"जाहीर माफी मागा, अन्यथा..."; पॉर्न स्टार म्हटल्यामुळे दुखावलेल्या 'त्या' अभिनेत्याचा चित्रा वाघ यांना इशारा

सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर झाले क्रॅश, Video सोशल मीडियावर व्हायरल

धक्कादायक! पत्नीनं दिलं गुंगीचं औषध, पतीनं केला बलात्कार...; मुंबईत नेमकं काय घडलं?

'वडा पाव गर्ल'ला दिल्ली पोलिसांनी केली अटक? रस्त्यावरील हाय-व्होल्टेज ड्रामाचा Video Viral!

गाडी आहे की टँक! 2024 Force Gurkha भारतात लॉन्च, Mahindra Tharला देणार टक्कर