VIDEO : अंधारात वळणावर उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव कारची धडक; इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा मृत्यू, दरवाजे कापून काढले मृतदेह (X व्हिडीओतून घेतलेले स्क्रीनशाॅट्स)
राष्ट्रीय

VIDEO : अंधारात वळणावर उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव कारची धडक; इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा मृत्यू, दरवाजे कापून काढले मृतदेह

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. चुराडा झालेल्या कारमधून...

किशोरी घायवट-उबाळे

त्रिशूर : केरळच्या त्रिशूरमध्ये शुक्रवारी (दि. ४) मध्यरात्री ११.४० च्या सुमारास भीषण अपघात झाला. अंधारात वळणावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला तामिळनाडूतील इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांची भरधाव कार धडकली. या अपघातात ८ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. धडक इतकी भीषण होती की कारचा चुराडा झाला असून, मृतदेह बाहेर काढण्यासाठी कारचे दरवाजे आणि इतर भाग कापावे लागले.

केरळमध्ये फिरण्यासाठी आले अन्...

मृतांमध्ये मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी तसेच त्यांचे मित्र होते. ते केरळमध्ये फिरण्यासाठी आले होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृतांपैकी सहा जणांची ओळख पटली असून, अन्य दोन जणांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

धडकेनंतर कारचा चुराडा

ट्रकला दिलेली धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चुराडा झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. चुराडा झालेल्या कारमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी वाहनाचे काही भाग कापावे लागले.

उड्डाणपुलाजवळ झाला अपघात

राष्ट्रीय महामार्गाच्या ज्या भागात रस्त्याचे बांधकाम सुरू आहे, त्या ठिकाणी उड्डाणपुलालगत हा अपघात झाला. रात्रीच्या वेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकसाठी योग्य इशारा संकेत किंवा पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

एनएचएआयच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

केरळचे क्रीडामंत्री ओ. जे. जनीश आणि कैपमंगलमचे आमदार के. के. वलसराज यांनी या अपघातासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. बांधकाम सुरू असलेल्या महामार्गावर अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप त्यांनी केला.

मंत्री जनीश यांच्या म्हणण्यानुसार, महामार्गावरील बांधकामावर देखरेख ठेवण्यासाठी केवळ एकच एनएचएआय अधिकारी आहे. या अधिकाऱ्याच्या अनुपस्थितीमुळे किंवा सुरक्षाविषयक उपाययोजनांच्या अपुऱ्या अंमलबजावणीमुळे परिस्थिती गंभीर झाल्याचा आरोप त्यांनी केला.

ट्रकचालक फरार

त्रिशूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मोहम्मद नदीमुद्दीन यांनी ट्रकचालक अपघातानंतर फरार झाल्याचे सांगितले. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक पावले उचलण्यात येत आहेत. महाराष्ट्र नोंदणी असलेल्या या ट्रकच्या मालकाची ओळख पटली आहे.

मृतदेह तामिळनाडूत नेण्याची व्यवस्था

अपघातातील सर्व मृतदेह त्रिशूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी शिखा सुरेंद्रन यांनी रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मृतदेह तामिळनाडूत नेण्यासाठी राज्य सरकारकडून आवश्यक व्यवस्था केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश

या दुर्घटनेत सात जणांचा घटनास्थळीच, तर एकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. मृतांची ओळख पटवण्यासाठी आणि मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले. शवविच्छेदन सुरू असताना आई-वडील, नातेवाईक आणि मित्रांचा आक्रोश पाहायला मिळाला. तरुण विद्यार्थ्यांच्या मृत्यूने तामिळनाडूतील त्यांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Thane : गणेशोत्सव, नवरात्रीला मंडप भाडेमाफीचा प्रस्ताव; महासभेच्या निर्णयाकडे मंडळांचे लक्ष

मेगा IPO येतोय...; दशकाची प्रतीक्षा अखेर संपली, NSE च्या ३० हजार कोटींच्या आयपीओला सेबीची मंजुरी

स्क्रॅप रिक्षांवर होणार कारवाई; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम, नियमबाह्य रिक्षा रडारवर

ठाण्यात आज पाहायला मिळणार दहीहंडीचा जल्लोष; थरावर थर आणि लाखांची बक्षिसे; मंडळांमध्ये मोठी चुरस

Mumbai : मध्य रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक; मुख्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक