‘टाइप-१’ मधुमेहावर प्रभावी ठरणार ‘जीन थेरपी’; एका इंजेक्शनने आजार बरा होण्याचा अंदाज (Photo-@medlineplus)
राष्ट्रीय

‘टाइप-१’ मधुमेहावर प्रभावी ठरणार ‘जीन थेरपी’; एका इंजेक्शनने आजार बरा होण्याचा अंदाज

जगभरात मधुमेह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मधुमेही रुग्णांना आपले जीवन शिस्तबद्ध पद्धतीत व्यतित करावे लागते.

Swapnil S

नवी दिल्ली : जगभरात मधुमेह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मधुमेही रुग्णांना आपले जीवन शिस्तबद्ध पद्धतीत व्यतित करावे लागते. मधुमेह केवळ नियंत्रित करता येतो, पण तो पूर्ण बरा होत नाही. आता ‘टाईप-१’ मधुमेहावर प्रभावी उपचार करणाऱ्या ‘जीन थेरपी’वर शास्त्रज्ञांनी मोठ्या प्रमाणावर संशोधन केले आहे. त्यामुळे ‘टाइम-१’ मधुमेह बरा होण्याची शक्यता वाढली आहे.

मधुमेहामुळे सातत्याने रक्तातील साखरेची तपासणी, खाण्यापिण्यावर कठोर निर्बंध रुग्णांना पाळावे लागतात. आता विज्ञानाच्या माध्यमातून नवीन संशोधन समोर आले असून, त्यामुळे मधुमेही रुग्णांच्या जीवनात नवीन आशेचा किरण जागवला गेला आहे.

‘इंटरनेशनल कॉन्फ्रेंस ऑन ॲॅडव्हान्स टेक्नोलॉजीज ॲॅण्ड ट्रीटमेंट्स फॉर डायबिटीज’मध्ये सादर करण्यात आलेल्या एका अहवालानुसार, शास्त्रज्ञांनी अशा एका विशिष्ट जीन थेरपीचा विकास केला आहे. ज्याच्या एका इंजेक्शनमुळे मानवी स्नायूंचे रूपांतर दीर्घकाळ इन्सुलिन तयार करणाऱ्या अवयवात होऊ शकते. या उपचार पद्धतीमुळे रुग्णांना वर्षानुवर्षे किंवा कदाचित दशकांपर्यंत शरीरात नैसर्गिकरीत्या इन्सुलिन मिळण्यास मदत होईल आणि त्यांना दररोज इन्सुलिनचे इंजेक्शन घेण्याची गरज भासणार नाही.

जगातील अशा प्रकारच्या पहिल्याच संशोधनात सुरुवातीला प्रौढांचा समावेश केला जाणार आहे. ज्यांचे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहत नाही आणि जे सध्या ‘ऑटोमेटेड इन्सुलिन डिलिव्हरी सिस्टिम’चा वापर करत आहेत. या थेरपीमुळे शरीरात किती इन्सुलिन तयार होते आणि रक्तातील ग्लुकोजची पातळी किती प्रभावीपणे स्थिर राहते, याचा बारकाईने अभ्यास शास्त्रज्ञांना करता येणार आहे. ‘टाइप-१’ मधुमेह हा एक ऑटोइम्यून आजार असून यामध्ये शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती स्वादुपिंडातील इन्सुलिन तयार करणाऱ्या बीटा पेशींवर चुकून हल्ला करून त्या नष्ट करते. यामुळे शरीरात पुरेसे इन्सुलिन तयार होत नाही आणि रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.

या आजाराचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी आनुवंशिकता आणि पर्यावरणीय घटक यासाठी कारणीभूत असू शकतात, असे संशोधनातून समोर आले आहे. काही वेळा ‘एंटेरोव्हायरस’सारखे विषाणू संसर्ग शरीराची प्रतिकारशक्ती बिघडवण्यास कारणीभूत ठरतात. ज्यांच्या कुटुंबात आधीच कोणाला हा आजार आहे, त्यांच्यामध्ये याचा धोका अधिक असतो. लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये हा आजार प्रामुख्याने आढळत असला तरी, तो कोणत्याही वयात होऊ शकतो. वारंवार लघवी होणे, जास्त तहान लागणे, वजन कमी होणे आणि दृष्टी धूसर होणे ही या आजाराची मुख्य लक्षणे आहेत. आतापर्यंत यावर रोजचे इंजेक्शन हाच एकमेव पर्याय होता, मात्र नव्या संशोधनामुळे रुग्णांसाठी आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे.

काय आहे ‘क्रिया-८३९’ थेरपी

इंग्लंडच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेतील मधुमेहाचे विशेष सल्लागार डॉक्टर पार्थ म्हणाले की, हे संशोधन खरोखरच अद‌्भूत आहे. हा आजार पूर्ण बरे करण्याची क्षमता यात आहे. याच्या चाचण्या यशस्वी झाल्यास लाखो लोकांना मदत मिळू शकते. ‘क्रिया-८३९’ थेरपीत इंजेक्शन किंवा यंत्राद्वारे इन्सुलिनची कमतरता कमी करण्याऐवजी रुग्णांच्या पेशीत दीर्घकाळ राहणारी इन्सुलिनची फॅक्टरी तयार केली जाते. एकदा इंजेक्शन दिल्यानंतर पेशीतील कोशिका इन्सुलिन व रक्तातील साखर नियंत्रण करणारे दुसरी प्रथिने बनवण्यास सुरुवात करतील. त्यामुळे रोज उपचार घेण्याची गरज लागणार नाही.

आपत्ती व्यवस्थापनात तुकाराम मुंढेंना ‘नो एंट्री’; पुन्हा विनिता वैद सिंघल यांची वर्णी

युद्धविराम धोक्यात! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हल्ला; होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव कायम, बैरुतमध्ये २०३ जणांचा मृत्यू

अखेर गारगाई धरण प्रकल्पाला मंजुरी; ठाकरे सेना समुद्राचे खारे पाणी गोडे करण्यावर ठाम, केंद्राची परवानगी लवकरच - गणेश खणकर

Assembly Elections 2026 : आसाम, केरळम विधानसभा निवडणुकीत विक्रमी मतदान

मंदिर प्रवेशात विशिष्ट समुदायाला वगळल्याने समाजात फूट पडेल; शबरीमलाप्रकरणी सुप्रीम कोर्टाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण