X |ANI
राष्ट्रीय

उधमपूरमध्ये बस दरीत कोसळून २१ प्रवाशांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात सोमवारी (दि.२०) सकाळी एक खासगी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात २१ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर २९ जण जखमी झाले आहेत.

Swapnil S

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात सोमवारी (दि.२०) सकाळी एक खासगी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात २१ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर २९ जण जखमी झाले आहेत. रामनगर येथून उधमपूरला जाणाऱ्या या बसने दरीत कोसळताना एका रिक्षालाही चिरडले. सुदैवाने, रिक्षातील प्रवासी या अपघातातून बचावले आहेत. सकाळी १० वाजेच्या सुमारास रामनगर भागातील कागोट गावानजीक एका वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. बस सुमारे १०० मीटर खोल दरीत कोसळली आणि खालच्या रस्त्यावर उपडी पडली. बसचा चक्काचूर झाला असून छत पूर्णपणे निखळले आहे.

याच मार्गावरून लष्कराचा एक ताफा जात होता. अपघात पाहताच जवानांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. स्थानिक नागरिक आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने जखमींना बसच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. गंभीर जखमींना तातडीने उधमपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून, काहींना एअरलिफ्ट करण्याची तयारीही प्रशासनाने केली आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.पंतप्रधानांनी मृतांच्या वारसांना २ लाख रुपये आणि जखमींना ५०,००० रुपयांची सानुग्रह मदत जाहीर केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला होता, तर ६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये बहुतांश लोक आपल्या दैनंदिन कामासाठी शहराकडे निघाले होते. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि स्थानिक नेत्यांनीही या घटनेवर शोक व्यक्त करत बचावकार्याचा आढावा घेतला आहे.

'तात्काळ देश सोडा'; इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट, भारत सरकारकडून महत्त्वाच्या सूचना

फिलिपिन्समध्ये ७.८ तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा हाय अलर्ट जारी, थरकाप उडवणारे Video व्हायरल

पोलिसाच्या मुलाला कॉपी करताना पकडलं; संतप्त वडिलांनी कॉलेजमध्ये घुसून शिक्षकांनाच कानफडलं, VIDEO व्हायरल

Mumbai : दादरमध्ये BEST बसचा भीषण अपघात; एकामागोमाग एक वाहनांना दिली धडक; एकाचा मृत्यू, Video

Mumbai : कुर्ल्यात जलवाहिनी बिघाडाचा फटका; दुरुस्ती पूर्ण, तरीही अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठ्याची शक्यता