राष्ट्रीय

केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिला मंत्रीपदाचा राजीनामा

नक्वींना भाजपतर्फे उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी मिळण्याची अटकळ व्यक्त केली जात आहे.

वृत्तसंस्था

केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी व आरसीपी सिंग यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी राजीनामा सुपूर्द केला. त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपुष्टात येण्याच्या एक दिवस आधी त्यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, नक्वींना भाजपतर्फे उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी मिळण्याची अटकळ व्यक्त केली जात आहे.

नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने नक्वी यांना उमेदवारी दिली नव्हती. तेव्हापासून पक्ष त्यांना मोठी जबाबदारी सोपवणार असल्याची चर्चा रंगली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनडीएकडून त्यांना उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दिली जाऊ शकते. नक्वी हे आतापर्यंत केंद्र सरकारमध्ये मंत्री होते. तसेच ते राज्यसभेत भाजप संसदीय पक्षाचे उपनेतेही होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी आणि आरसीपी सिंह यांचेही कौतुक केले. मोदी म्हणाले की, तुम्ही देशाच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर नक्वी यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. मात्र, दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

नक्वी यांच्यासोबत जनता दल युनायटेडच्या कोट्यातील केंद्र सरकारमधील मंत्री आरसीपी सिंह यांनीही मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आहे. जेडीयूनेही त्यांना राज्यसभेची पुढील टर्म दिलेली नाही. आरसीपी सिंह यांचा राज्यसभा खासदार म्हणून गुरुवारी शेवटचा दिवस आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी