दिल्ली : उत्तर प्रदेशच्या उन्नाव बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या माजी आमदार कुलदीप सिंह सेंगरला दिल्ली हायकोर्टाने मंगळवारी दिलासा दिला आहे. कोर्टाने सेंगर याच्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती देत जामीन मंजूर केला आहे.
कोर्टाने आदेशात सेंगरला दिलेली जन्मठेपेची शिक्षा स्थगित केली आहे. सेंगरला १५ लाखांचा वैयक्तिक जातमुचलका आणि तीन जामिनावर सोडण्यात आले आहे. कोर्टाने सेंगरला जामीन देताना काही अटी देखील घातल्या आहेत. जामिनानुसार, सेंगरला पीडित मुलीच्या घराच्या ५ किलोमीटरच्या हद्दीत जाता येणार नाही.
तसेच सेंगरला आता त्याचा पासपोर्टही कोर्टात जमा करावा लागणार आहे. त्याला प्रत्येक सोमवारी पोलीस स्टेशनला हजेरी लावावी लागणार आहे. त्याचबरोबर कोर्टाने सेंगरला पीडित कुटुंबाला न धमकावण्याचे आदेश दिले आहेत.