राष्ट्रीय

डेहराडूनला ढगफुटी; १५ मजूर वाहून गेले; हिमाचल प्रदेश, उत्तराखंडला पावसाचा तडाखा

गेल्या काही महिन्यांत वारंवार नैसर्गिक आपत्तींचा फटका बसलेल्या हिमालयीन राज्यांना पुन्हा एकदा मुसळधार पावसाने तडाखा दिला. हिमाचल प्रदेश, उत्तराखंडला पावसाने झोडपून काढले. डेहराडून येथे ढगफुटी झाली. यात १५ मजूर वाहून गेले. पावसामुळे विविध नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली.

Swapnil S

डेहराडून/सिमला : गेल्या काही महिन्यांत वारंवार नैसर्गिक आपत्तींचा फटका बसलेल्या हिमालयीन राज्यांना पुन्हा एकदा मुसळधार पावसाने तडाखा दिला. हिमाचल प्रदेश, उत्तराखंडला पावसाने झोडपून काढले. डेहराडून येथे ढगफुटी झाली. यात १५ मजूर वाहून गेले. पावसामुळे विविध नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली. हे पुराचे पाणी घर, दुकान व मंदिरात घुसले. टोंस नदीत पाणी वाढल्याने मजुरांनी भरलेली ट्रॉली वाहून गेली. यात ८ जणांचा मृत्यू, तर ४ जण बेपत्ता झाले. तसेच शेकडो जण अडकले आहेत.

घटनास्थळी एसडीआरएफ, एनडीआरएफ व स्थानिक प्रशासन मदत व बचावकार्य करत आहे. हिमाचल प्रदेशात मंगळवारी मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलन आणि अचानक आलेल्या पुरात एका कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला.

डोंगराळ उतारावरून आलेल्या पाण्याच्या प्रचंड लोटांनी गाड्या वाहून नेल्या, घरे व व्यापारी आस्थापने उद्ध्वस्त केली. उत्तराखंडमध्ये एक पूलही वाहून गेला. पावसामुळे दोन्ही राज्यांतील बहुतांश हिमनदी-आधारित नद्या-ओढे तुडुंब वाहत आहेत. उत्तराखंडमध्ये गंगा व यमुना नदी इशारा पातळीच्या जवळ पोहोचल्या, तर टोंस (तमसा) नदी धोक्याच्या पातळीच्या अगदी जवळ गेली.

तमसा नदीत पाण्याचा प्रवाह वाढल्याने तिच्या तीरावरील प्रसिद्ध टपकेश्वर मंदिर जलमय झाले. प्रवेशद्वाराजवळील प्रचंड हनुमानाची मूर्ती खांद्यांपर्यंत पाण्यात बुडाली. मंदिराचे पुजारी बिपिन जोशी म्हणाले, गेल्या २५-३० वर्षांत नदीचे पाणी इतके वाढलेले मी पाहिले नव्हते.

सॉंग नदी दुथडी भरून वाहू लागल्याने आसपासची गावे-पाडे पाण्याखाली गेले. मालदेवता भागातील पुलाला धोका निर्माण झाला आहे.

राज्याचे आपत्ती व्यवस्थापन सचिव विनोदकुमार सुमन यांनी सांगितले की, मदत व बचाव पथके कार्यरत असून ३०० ते ४०० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले आहे. डेहराडूनच्या पोंढा भागातील देवभूमी इन्स्टिट्यूटमध्ये पाण्यात अडकलेल्या सुमारे २०० मुलांना ‘एसडीआरएफ’ने सुखरूप बाहेर काढले.

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी डेहराडून जिल्ह्यातील बाधित भागांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. “सर्व नद्यांना पूर आला आहे. २५ ते ३० ठिकाणी रस्ते तुटले आहेत. घरे व शासकीय मालमत्ता उद्ध्वस्त झाली आहे. सामान्य जीवन विस्कळीत झाले आहे. मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे,” असे ते म्हणाले.

"...तर महिलांना कोणी नोकरी देणार नाही"; मासिक पाळी रजेची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Maharashtra Weather : हवामान खात्याचा अंदाज; राज्यात चार दिवस वादळी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

Mumbai : पालिका शाळाही ‘गॅस’वर; मध्यान्ह भोजनात आता विद्यार्थ्यांना फळ वाटप, रुग्णालयांत सिलिंडर पुरवठा करण्यासाठी गॅस कंपनीला पत्र

अजित पवारांच्या अपघातातील सत्य सांगा! राष्ट्रवादीच्या सुनील शेळके यांची मागणी

ST डेपोच्या विकासासाठी भाडेकराराला ९८ वर्षांपर्यंत वाढ; सरकारकडे प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी दाखल