राष्ट्रीय

मतदानाचा विक्रम! पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात ९२, तर तमिळनाडूत सर्वाधिक ८५ टक्के मतदान

आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीप्रमाणेच पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूमध्येही विक्रमी मतदान झाले आहे.

Swapnil S

कोलकाता/चेन्नई : आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीप्रमाणेच पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूमध्येही विक्रमी मतदान झाले आहे. गुरुवारी बंगाल निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात २९४ पैकी १५२ जागांवर ९२% मतदान झाले. तमिळनाडूत २३४ जागांवर विक्रमी ८५% मतदान झाले. राज्याच्या इतिहासातील हे आतापर्यंतचे सर्वाधिक मतदान आहे. निवडणूक आयोगाची आकडेवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंतची आहे. यात बदल होऊ शकतो. तमिळनाडूमध्ये आतापर्यंत १४ वेळा निवडणुका झाल्या, मात्र यावेळी विक्रमी मतदान झाले.

मुर्शिदाबादमध्ये बॉम्ब हल्ला : कबीर यांचे धरणे आंदोलन

मुर्शिदाबादच्या नौदामध्ये मतदान सुरू होण्यापूर्वी एक क्रूड बॉम्ब फेकला गेला. यात अनेक जण जखमी झाले. त्यानंतर, आम जनता उन्नयन पार्टीचे (एजेयूपी) प्रमुख हुमायूं कबीर सकाळी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना विरोधाचा सामना करावा लागला. त्यांचा टीएमसी कार्यकर्त्यांशी संघर्षही झाला. त्यानंतर त्यांनी धरणे आंदोलन केले. ते म्हणाले, ‘आमच्या समर्थकांना मारहाण केली जात आहे’. नौदा घटनेप्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून दोन जणांना अटक केली आहे.

ईव्हीएममधील बिघाडामुळे गोंधळ

सिलिगुडीमध्येही मतदानादरम्यान भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला. मालदा येथील एका मतदान केंद्रावर ईव्हीएममधील बिघाडामुळे गोंधळ झाला. लोकांनी निवडणूक अधिकाऱ्याला घेराव घालून आक्षेप नोंदवले. दरम्यान, राज्यभरातील मतदान केंद्रांवर सकाळपासूनच लांबच लांब रांगा दिसत होत्या. येथे महिलांची संख्या अधिक आहे.

दुसऱ्या टप्प्यासाठी २९ एप्रिल रोजी मतदान

तामिळनाडूमध्येही अशीच परिस्थिती दिसून येत आहे. बंगालमध्ये टीएमसी आणि भाजप यांच्यात मुख्य लढत आहे. निवडणूक आयोग येथे वेबकास्टिंगद्वारे (थेट निरीक्षण) मतदान केंद्रांवर देखरेख ठेवून आहे. राज्यातील उर्वरित १४२ जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.तर निकाल ४ मे रोजी जाहीर होईल.

भाजप-टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये अनेक ठिकाणी संघर्ष

अग्निमित्रा यांनी हिरापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बंगालमधील इतर अनेक ठिकाणी भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाल्याचे वृत्त आहे. अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचेही वृत्त आहे. बीरभूमच्या बोधपूर गावात ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने लोकांनी पोलीस आणि केंद्रीय दलांवर दगडफेक केली. पोलिसांच्या एका वाहनाचीही तोडफोड करण्यात आली. या घटनेत अनेक सुरक्षा कर्मचारी जखमी झाले.

कुमारगंज मतदारसंघात भाजप उमेदवारावर हल्ला

पश्चिम बंगालमधील दक्षिण मिदनापूर येथील कुमारगंज मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुवेंदू सरकार यांच्यावर हल्ला झाला. एका व्हिडीओमध्ये सुवेंदू आपल्या सुरक्षारक्षकासह हल्ल्यातून वाचण्यासाठी पळताना दिसत आहेत. असे असूनही, जमाव त्यांना मारहाण करतच राहिला. दरम्यान, बर्नपूरच्या रहमतनगर परिसरात आसनसोल दक्षिण मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या गाडीवरही हल्ला झाला. अग्निमित्रा यांनी सांगितले की, मतदान केंद्रातून बाहेर पडत असताना त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली.

होर्मुझमध्ये अडथळा आणणाऱ्या इराणच्या बोटी उडवा; डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकी नौदलाला आदेश

पुरवठा साखळीच्या मजबुतीवर ठरतो विजेता

महिला आरक्षणाच्या आडून राजकीय डाव

आजचे राशिभविष्य, २४ एप्रिल २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

दिवसभर AC मध्ये राहिल्यामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज झालीये? ग्लो वाढवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय