तृणमूल कार्यालयावर जमावाचा बुलडोझर; बंगालमध्ये हिंसाचार, केंद्रीय पथकांवर हल्ले 
राष्ट्रीय

तृणमूल कार्यालयावर जमावाचा बुलडोझर; बंगालमध्ये हिंसाचार, केंद्रीय पथकांवर हल्ले

मतदानाच्या काळात शांत राहिलेल्या बंगालमध्ये निवडणुकीचे निकाल घोषित होताच अनेक ठिकाणी हिंसाचार उसळला. कोलकात्यातील प्रसिद्ध हॉग मार्केट परिसरात ५ मेच्या रात्री जमावाने बुलडोझर चालवून तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले. हे कार्यालय अवैधरित्या कह्यात घेतलेल्या भूमीवर बांधण्यात आले होते, असा दावा स्थानिक लोकांनी केला आहे.

Swapnil S

कोलकाता : मतदानाच्या काळात शांत राहिलेल्या बंगालमध्ये निवडणुकीचे निकाल घोषित होताच अनेक ठिकाणी हिंसाचार उसळला. कोलकात्यातील प्रसिद्ध हॉग मार्केट परिसरात ५ मेच्या रात्री जमावाने बुलडोझर चालवून तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले. हे कार्यालय अवैधरित्या कह्यात घेतलेल्या भूमीवर बांधण्यात आले होते, असा दावा स्थानिक लोकांनी केला आहे.

स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार हे कार्यालय एका दुकानदाराकडून जबरदस्तीने हिसकावून घेतलेल्या जमिनीवर बांधण्यात आले होते. दीर्घकाळापासून लोक यामुळे संतापलेले होते. घटनास्थळी उपस्थित असलेले लोक याला 'जनतेचा न्याय' म्हणत आहेत.

दुसऱ्या घटनेत न्यू टाऊनमध्ये भाजपचे कार्यकर्ते मधू मंडल यांना तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांनी मारहाण केली. यात त्यांचा मृत्यू झाला. अनेक ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या घरांवरही हल्ले झाले.

उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखालीमध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. पाच मे रोजी उशिरा रात्री बामन घेरी परिसरात गस्त घालणाऱ्या पोलीस आणि केंद्रीय दलाच्या पथकावर अज्ञातांकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. पोलीस ठाण्याचे प्रमुख भरत पुरकैत, एक महिला अधिकारी आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे दोन सैनिक यांच्यासह एकूण पाच जणांना गोळ्या लागल्या आहेत. सर्व जखमींना कोलकात्यातील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

भाजपला मतदान केल्याने मारहाण

उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील आमडंगा विधानसभा मतदारसंघातील बाराडीह भागात एका कुटुंबावर जीवघेणे आक्रमण करण्यात आले. पीडित मदन मोरोल यांचा असा आरोप आहे की, त्यांनी निवडणुकीत भाजपला मतदान केले होते; याच रागातून तृणमूल काँग्रेसच्या ४० ते ५० गुंडांनी रात्री उशिरा त्यांच्या घरावर आक्रमण केले. घराची तोडफोड करण्यासह कुटुंबियांना मारहाण करण्यात आली.

दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील फालता येथे २१ मे दिवशी पुन्हा मतदान होणार आहे. त्यापूर्वीच येथील तृणमूल काँग्रेसचा नेता जहांगीर खान यांच्या कार्यालयावर जमावाने आक्रमण करून तोडफोड करत जाळपोळ केली. तसेच तृणमूलचे झेंडे काढून त्याठिकाणी भाजपचे झेंडे लावले आणि जोरदार घोषणाबाजीही केली. ग्रामस्थांनी असा आरोप केला होता की, जहांगीर खान याने गावात येऊन त्यांना जीवे मारण्याची आणि महिलांवर बलात्कार करण्याची धमकी दिली होती. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

प्रशासनाने मागवला अहवाल

राज्याच्या विविध भागांत झालेली तोडफोड आणि जाळपोळ यांच्या घटनांची निवडणूक आयोगाने गांभीर्याने नोंद घेतली आहे. आयोगाने पोलिसांकडून संपूर्ण अहवाल मागवला आहे. कायदा हातात घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सोडणार नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

धारदार शस्त्रे, दारुगोळा जप्त

दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात असलेल्या नारायणपूरमधील घुटीयारी शरीफ येथे तृणमूल काँग्रेसचे नेते सलाउद्दीन सरकार यांच्या कार्यालयावर पोलिसांनी धाड घातली. कार्यालयाच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात धारदार शस्त्रे, तसेच दारुगोळा हस्तगत करण्यात आला. पोलिसांना कार्यालयात शस्त्रे लपवून ठेवल्याची माहिती गुप्तचरांकडून मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळावरून १८ धारदार शस्त्रे जप्त केली. इतक्या मोठ्या संख्येने शस्त्रे का साठवून ठेवण्यात आली होती, याचे अन्वेषण पोलीस करत आहेत. या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Mumbai : गणेशभक्तांना दिलासा; मध्यरात्रीपर्यंत धावणार ॲक्वा लाईन मेट्रो, जाणून घ्या वेळ

बेपत्ता मुलाला मृत समजून केले अंत्यसंस्कार; काही दिवसांनी आला फोन, 'तो जिवंत आहे'

Delhi : उशिरा घरी परतल्याने कुटुंबीय रागावले; १३ वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल

Mumbai : भुलेश्वर, गिरगावात बुलडोझर; एसव्हीपी रोडवरील फुटपाथ अतिक्रमणांवर हातोडा, तीन मोठ्या लॉरी भरून साहित्य हटवले

जिल्हा, न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या मागणीला पाठिंबा; महाराष्ट्र राज्य न्यायाधीश संघटनेचा निर्णय