आजकाल ऑफिसमध्ये कामासाठी WhatsApp Web वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अनेकजण दिवसभर कॉम्प्युटरवर WhatsApp सुरू ठेवूनच काम करतात. काम संपल्यानंतर घाईघाईत ऑफिसमधून निघताना तुम्हीही WhatsApp Web तसेच सुरू ठेवून जात असाल, तर सावध व्हा! 'हा माझाच कॉम्प्युटर आहे, माझ्या मागे इथे कोण बसणार आणि माझे चॅट कोण वाचणार?' असा विचार करून निष्काळजी राहू नका. कारण तुमची ही छोटीशी चूक तुमचे खासगी मेसेज आणि महत्त्वाची माहिती दुसऱ्यांच्या हाती देऊ शकते. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने WhatsApp Web वापरणाऱ्यांना महत्त्वाचा इशारा दिला असून, वापरानंतर अकाउंट लॉगआउट करण्याचे आवाहन केले आहे.
ऑफिसच्या कॉम्प्युटरवर व्हॉट्सॲप वेब वापरल्यानंतर खाते लॉगआउट न करता निघून गेलात, तर तुमच्या खासगी माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. अशा सक्रिय खात्याचा गैरफायदा घेऊन इतर व्यक्ती तुमचे खासगी मेसेज, संपर्क यादी आणि ग्रुपमधील संभाषणे पाहू शकतात. तसेच तुमच्या नावाने इतरांना मेसेजही पाठवू शकतात. याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाच्या भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राच्या (आय४सी) राष्ट्रीय सायबर गुन्हे धोका विश्लेषण विभागाने (एनसीटीएयू) सोमवारी (दि. २३) महत्त्वाचा इशारा दिला आहे.
व्हॉट्सॲप वेबमधून नेमका कसा होऊ शकतो गैरवापर?
व्हॉट्सॲप वेबवर लॉगिन केलेले खाते सक्रिय राहिल्यास त्याचा इतर व्यक्तींकडून गैरवापर होऊ शकतो, असे सरकारी सूचनेत म्हटले आहे. अशा वेळी संबंधित व्यक्ती तुमचे खासगी चॅट वाचू शकते. तसेच संपर्क यादी आणि ग्रुपमधील संभाषणेही पाहू शकते. एवढेच नव्हे, तर तुमच्या नावाने इतरांना मेसेज पाठवण्याचाही धोका असतो.
तुमच्या खात्याचा वापर करून आर्थिक फसवणूक, फिशिंग किंवा इतर सायबर गुन्हे केले जाऊ शकतात. त्यामुळे सरकारी, संस्थात्मक, आर्थिक किंवा गोपनीय माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी कॉम्प्युटरवरील व्हॉट्सॲप वेबचा वापर टाळावा, अशी शिफारस करण्यात आली आहे.
काम संपल्यानंतर लॉगआउट करायला विसरू नका
अनेकांना ब्राउझरमधील व्हॉट्सॲप वेबचा टॅब बंद केला की खाते आपोआप लॉगआउट होते, असे वाटते. मात्र, टॅब किंवा ब्राउझर बंद केल्यानंतरही खाते लॉगिन राहते. त्यामुळे काम पूर्ण झाल्यावर व्हॉट्सॲप वेबमधून स्वतः लॉगआउट करणे आवश्यक आहे.
विशेषतः ऑफिसमध्ये सहकाऱ्यांसोबत एकच कॉम्प्युटर वापरत असाल, तर ही खबरदारी अधिक महत्त्वाची आहे. निघण्यापूर्वी लॉगआउट झाले आहे की नाही, याची खात्री करून घ्या.
इन्कॉग्निटो मोड वापरता? तरीही लॉगआउट करा
काही काळासाठी व्हॉट्सॲप वेब वापरणे आवश्यक असल्यास विश्वासार्ह कॉम्प्युटरवर इन्कॉग्निटो किंवा खासगी ब्राउझिंग विंडोचा वापर करता येईल, असा सल्ला देण्यात आला आहे. मात्र, हा पर्याय वापरला तरी ब्राउझर बंद करण्यापूर्वी स्वतः लॉगआउट करणे गरजेचे आहे. इन्कॉग्निटो मोड हा लॉगआउट करण्याचा पर्याय नाही, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
सार्वजनिक कॉम्प्युटरवर व्हॉट्सॲप वेब वापरणे टाळा
सायबर कॅफे, सार्वजनिक किऑस्क, हॉटेलमधील बिझनेस सेंटर किंवा इतरांकडून वापरण्यासाठी घेतलेल्या कॉम्प्युटरवर व्हॉट्सॲप वेबमध्ये लॉगिन करणे टाळावे, असेही सरकारी सूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. अशा कॉम्प्युटरचा वापर अनेक व्यक्ती करत असल्याने तुमच्या खात्याच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो.
तुमच्या खात्यातून असे मेसेज जात असतील तर सावधान
व्हॉट्सॲप खात्यात काही संशयास्पद हालचाली दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. उदाहरणार्थ, तुम्ही न पाठवलेले मेसेज तुमच्या खात्यातून इतरांना जाणे किंवा संपर्कातील व्यक्तींकडून अनपेक्षित उत्तरे येणे, ही धोक्याची चिन्हे असू शकतात. अशा हालचाली आढळल्यास खात्याची सुरक्षितता तपासणे आवश्यक आहे.
याशिवाय मोबाईल, संगणक, ऑपरेटिंग सिस्टीम आणि ब्राउझर नियमितपणे अपडेट ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. सुरक्षा सॉफ्टवेअर अपडेट करावे. अनोळखी फाइल्स, संशयास्पद लिंक किंवा बेकायदेशीररीत्या बदललेले सॉफ्टवेअर डाउनलोड करणे टाळावे, असेही केंद्र सरकारने सांगितले आहे. त्यामुळे ऑफिसमधून बाहेर पडताना व्हॉट्सॲप वेबमधून लॉगआउट करण्याची सवय लावा आणि आपल्या खासगी माहितीची सुरक्षितता जपा.