हनिमूनला अख्खं कुटुंबच घेऊन गेला; पत्नीने थेट घटस्फोट मागितला  'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

हनिमूनला अख्खं कुटुंबच घेऊन गेला; पत्नीने थेट घटस्फोट मागितला

हनिमूनसाठी नैनितालला जाताना नवऱ्याने आई-वडील आणि भावंडांनाही सोबत नेल्याने पत्नी संतापली. त्यानंतर दुसऱ्या ट्रिपलाही कुटुंबीयांना घेऊन जाण्याच्या आग्रहावरून वाद वाढत गेला आणि अखेर प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले.

Mayuri Gawade

लग्नानंतर नवदाम्पत्याने एकमेकांसोबत निवांत वेळ घालवावा, एकमेकांना समजून घ्यावे यासाठी हनिमूनला विशेष महत्त्व असते. मात्र उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये घडलेल्या एका अनोख्या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हनिमूनसाठी नैनितालला गेलेल्या नवऱ्याने स्वतःचे आई-वडील आणि भावंडांनाही सोबत नेल्याने पत्नी संतापली. एवढेच नाही, तर त्यानंतर नियोजित करण्यात आलेल्या आणखी एका ट्रिपलाही कुटुंबीयांना सोबत नेण्याचा पतीचा आग्रह होता. याच मुद्द्यावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत गेले आणि अखेर प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले.

अरेंज मॅरेजनंतर नैनितालला हनिमून

मिळालेल्या माहितीनुसार, मेरठ जिल्ह्यातील रामराज परिसरातील तरुणीचा विवाह दिल्लीतील पटेल नगर येथे राहणाऱ्या तरुणासोबत एका विवाह संकेतस्थळाच्या माध्यमातून ठरला होता. गेल्या वर्षी दोघांचे लग्न झाले. लग्नानंतर हे जोडपे हनिमूनसाठी नैनितालला गेले. मात्र प्रवासाला निघाल्यानंतर पत्नीला धक्का बसला. कारण तिच्यासोबत केवळ एकटा नवरा नव्हता, तर त्याचे आई-वडील, भाऊ आणि बहीणही होते.

हनिमून की कौटुंबिक सहल?

पत्नीच्या म्हणण्यानुसार, हनिमून हा नवरा-बायकोसाठी खासगी आणि संस्मरणीय क्षण असतो. मात्र नवऱ्याच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीमुळे दोघांना एकत्र वेळ घालवण्याची संधीच मिळाली नाही. नैनितालहून परतल्यानंतर या मुद्द्यावरून दोघांमध्ये वारंवार वाद होऊ लागले. पत्नीने याबाबत नाराजी व्यक्त केली. मात्र नवऱ्याला त्यात काहीही गैर वाटत नव्हते.

दुबई ट्रिपवरूनही वाढला वाद

माहितीनुसार, काही काळानंतर दोघांनी दुबईला जाण्याचा बेत आखला. पत्नीला यावेळी तरी फक्त दोघांनीच सहलीला जावे, अशी अपेक्षा होती. मात्र नवऱ्याने पुन्हा एकदा आपल्या कुटुंबीयांनाही सोबत घेऊन जाण्याची इच्छा व्यक्त केली. यामुळे दोघांमधील मतभेद आणखी तीव्र झाले आणि वाद वाढत गेला.

प्रकरण पोहोचले पोलिस ठाण्यात

दोघांमधील तणाव वाढल्यानंतर हे प्रकरण अखेर पोलिस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी दोन्ही बाजूंमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तो निष्फळ ठरला. त्यानंतर हे प्रकरण कौटुंबिक समुपदेशन केंद्राकडे पाठवण्यात आले.

तीन बैठका, तरी तोडगा नाही

कौटुंबिक समुपदेशन केंद्रात पती-पत्नीची तीन वेळा स्वतंत्रपणे समुपदेशन सत्रे घेण्यात आली. दोघांनाही आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. मात्र प्रत्येक बैठकीत दोघांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले. समुपदेशकांनी समेटासाठी प्रयत्न केले, पण दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम राहिले. अखेरीस अनेक प्रयत्नांनंतरही मतभेद दूर न झाल्याने दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय कायम ठेवला असून हे प्रकरण सध्या चर्चेचा विषय बनले आहे.

सामान्य माणसाच्या कल्याणासाठी काम करा; अर्थमंत्री सीतारामन यांचे प्राप्तिकर विभागाला निर्देश

Nashik : भरधाव ट्रक फ्लायओव्हरवरून थेट ५० फूट खाली कोसळला; सिन्नरमधील भीषण अपघाताचा VIDEO व्हायरल

महाराष्ट्रात ८७.७९ टक्के मतदार अर्जांचे वाटप पूर्ण; १ लाखाहून अधिक BLO कडून मतदार याद्यांचे पुनरीक्षण

Mumbai : तीन वर्षांची असताना गिळलं टोपण; टीबी-दमा समजून डॉक्टरांनी ७ वर्षे केले चुकीचे उपचार, अखेर मुलीच्या फुफ्फुसाचा भाग काढला

Mumbai : पोलिसांची गाडी रोखणाऱ्या 'त्या' तरुणीची सायबर सेलमध्ये धाव; ऑनलाइन छळ, अश्लील ट्रोलिंगविरोधात तक्रार