राष्ट्रीय

डॉ. सुमित लहानेंना शस्त्रक्रिया करायला का दिल्या? जे. जे.च्या अधिष्ठातांनी मागवला खुलासा

निवासी डॉक्टरांनी पुरावा म्हणून सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे समितीने विचारलेले तीन मुद्देही स्पष्ट करावेत

स्वप्नील मिश्रा

ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांचा मुलगा डॉ. सुमित लहाने यांना नेत्ररोग विभागात शस्त्रक्रिया करायला परवानगी कोणत्या आधारावर देण्यात आली, याचा खुलासा करा, असे आदेश जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी डॉ. रागिणी पारेख यांना दिला आहे.

वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने डॉ. सुमित लहाने यांच्याविरोधातील तपास अहवाल सादर केला. जे. जे.च्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे म्हणाल्या की, समितीने डॉ. सुमित लहाने यांच्या नियुक्तीबाबत विभाग प्रमुख डॉ. रागिणी पारेख यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे. निवासी डॉक्टरांनी पुरावा म्हणून सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे समितीने विचारलेले तीन मुद्देही स्पष्ट करावेत, असे अधिष्ठात्यांना सादर केलेल्या अहवालात स्पष्ट झाले आहे.

या अहवालानुसार, डॉ. सुमित लहाने यांनी मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. तसेच ते ओपीडीत रुग्णांना तपासत होते. डॉ. लहाने यांना रुग्णांना तपासण्यासाठी किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी सरकारने कोणते पत्र दिले किंवा आदेश दिला का? त्याची छायाप्रत असल्यास ती सादर करावी. समितीने विचारलेला तिसरा मुद्दा असा आहे की, डॉ. सुमित लहाने आणि डॉ. रागिणी पारेख यांच्यावर फौजदारी खटला दाखल केला जाऊ शकतो. कारण बाहेरील व्यक्तींनी रुग्णाच्या तपासण्या, शस्त्रक्रिया आणि इतर रुग्णसेवा आदेशाशिवाय करणे कायदेशीर गुन्हा आहे. आम्ही सर्व मुद्यांवर खुलासा करण्याचे आदेश डॉ. पारेख यांना दिले आहेत. डॉ. सुमित लहाने यांच्यावर गुन्हा दाखल न करण्याचे तपशीलवार स्पष्टीकरण आणि कारण विचारले आहे, असे डॉ. सापळे यांनी म्हटले आहे. या प्रकरणी डॉ. पारेख यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

जे.जे.त पुन्हा जाणार नाही

पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचा ठाम निर्धार

जे.जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी केलेल्या आरोपांमुळे मानसिक खच्चीकरण झाले आहे. झालेल्या आरोपांची निःपक्ष चौकशी झाली नसून यापुढे जे.जे. रुग्णालयात पुन्हा जाणार नाही, अशी ठाम भूमिका पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी मांडली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

‘‘गेली ३६ वर्षे गरीब, गरजू, कष्टकरी तसेच कर्करोगी रुग्णांच्या मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून त्यांना दृष्टी मिळवून दिली. मात्र, आता सहन होत नाही. आता यापुढे जे. जे. रुग्णालयाशी आपला संबंध राहणार नाही. मी साडेचौदा लाख शस्त्रक्रिया केल्या होत्या. आताही २७ लाख करावयाच्या आहेत. मात्र, मीही स्वाभिमानी आहे. असे आरोप होत असतील तर आमचे राजीनामे स्वीकारावेत आणि आम्हाला कार्यमुक्त करा, असे डॉ. लहाने यांनी सांगितले.

डॉ. सुमित लहाने यांनी एनएमसीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार काम केले आहे. त्याने कॅन्सर रुग्णांवर उपचार केले. त्या रुग्णांसाठी तो जे. जे. रुग्णालयात येत असे. मात्र, आता आमच्यावर गुन्हा दाखल करण्यापर्यंत मजल गेली असून, रुग्णांसाठी आम्ही तुरुंगात जायला तयार आहोत, असे डॉ. लहाने म्हणाले.

सोमवारपासून राज्यभर संपाची हाक

नेत्रशल्य चिकित्सा विभाग प्रमुख डॉ. रागिणी पारेख आणि डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडून होत असलेल्या छळाविरोधात जे.जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी पुकारलेला संप तिसऱ्या दिवशीही कायम राहिला. सोमवारपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये संप पुकारण्यात येईल, असे पत्र जे.जे. मार्डच्या निवासी डॉक्टरांकडून वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांना पाठवण्यात आले आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

ठाकरेंचे वलय संपले का?