मध्यरात्रीनंतर ग्राहक आणि फूड डिलिव्हरी एजंटमध्ये झालेल्या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, डिलिव्हरी पार्टनर्सच्या कामाच्या अटी, आदर आणि ग्राहकांच्या अपेक्षा यावर पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
नेमकं काय घडलं?
ही घटना रात्री अडीच वाजेच्या सुमारास घडल्याचे सांगितले जाते. झोमॅटोचा एक डिलिव्हरी पार्टनर ऑर्डर पोहोचवण्यासाठी ग्राहकाच्या ठिकाणी पोहोचला होता. मात्र, ग्राहकाने फोनवरून वारंवार वर येऊन (घरात) ऑर्डर देण्याची मागणी केली. डिलिव्हरी पार्टनरने उशिराची वेळ आणि ठरलेला ‘डोअरस्टेप’ पॉइंट ओलांडून वर येण्यास नकार दिल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला, असा दावा संबंधित रायडरने केला आहे.
‘आम्हालाही आदर हवा’
वादानंतर संतप्त झालेल्या डिलिव्हरी पार्टनरने एक व्हिडीओ रेकॉर्ड केला, जो नंतर अंकुर ठाकूर या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला. व्हिडीओमध्ये रायडरने रात्री उशिरापर्यंत, शारीरिकदृष्ट्या कठीण परिस्थितीत काम करावे लागते, याबद्दल बोलताना ग्राहकांकडून किमान सन्मानाची अपेक्षा व्यक्त केली. “आम्हाला विशेष वागणूक नको, फक्त नीट बोलणं आणि संयम हवा,” असे तो म्हणतो. रायडरच्या म्हणण्यानुसार, वर येण्यास नकार दिल्यानंतर ग्राहकाने ऑर्डर रद्द करण्याची धमकी दिली. त्यावर रायडरने ऑर्डर रद्द करण्यास सांगितले. ऑर्डर रद्द झाल्यानंतर त्याने कॅमेऱ्यावर बिर्याणी, गुलाबजाम आणि इतर पदार्थ दाखवत, “आता ऑर्डर कॅन्सल झाली आहे, मीच हे अन्न खातोय,” असे म्हणत गुलाबजाम खाल्ल्याचा क्षण व्हिडीओत टिपला गेला.
सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया
हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांमध्ये मतभेद दिसून आले. काहींनी रायडरच्या भूमिकेला पाठिंबा दिला. एका युजरने लिहिले, “डिलिव्हरी पार्टनरही माणसंच आहेत, गुलाम नाहीत". मात्र, अनेकांनी ग्राहकाची बाजू घेतली. “डोअरस्टेप डिलिव्हरी म्हणजे घरापर्यंतच. ग्राहक यासाठी अतिरिक्त पैसे देतो,” अशी प्रतिक्रिया काहींनी दिली.
तर काहींनी, “सोयीसाठी प्रीमियम चार्ज घेतला जातो, इतके अतिरिक्त पैसे आकारले जातात, मग घरापर्यंत डिलिव्हरी करणं हा त्यांच्या नोकरीचाच भाग आहे” असे मत व्यक्त केले. सध्या नेटकऱ्यांकडून यावर गरमागरम चर्चा सुरू असल्याचं बघायला मिळतंय.