नवी मुंबई

७ हजार प्रवाशांना फटका; एनएमएमटीमार्फत उरणला जाणाऱ्या बसेस बंद

Swapnil S

उरण : नवी मुंबई परिवहन विभागाची उरणला जाणारी बससेवा शुक्रवारपासून अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. नवी मुंबई परिवहन विभागाची उरणला जाणारी बससेवा अनिश्चित काळासाठी बंद केल्यामुळे प्रवाशांच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

काही दिवसांपूर्वी उरण तालुक्यातील खोपटे येथे झालेल्या अपघाताच्या घटनेनंतर नागरिकांनी बसचालक आणि कंडक्टरला मारहाण केली होती. त्यानंतर देखील उरणमध्ये जाणाऱ्या बसमधील चालकास धमकी व मारहाणीच्या घटना सुरूच होत्या. नवी मुंबई परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांमध्ये वारंवार होणाऱ्या मारहाणीच्या घटनांमुळे भीतीचे वातावरण पसरले होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी उरणला जाणारी बससेवा बंद करण्याची मागणी केली होती.

कर्मचाऱ्यांच्या मागणीनंतर कामगारांची सुरक्षितता महत्त्वाची असल्याने उरण मार्गावर धावणारी ३० आणि ३१ नंबरची बससेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन अधिकारी योगेश कडुस्कर यांनी दिली आहे. या मार्गावरील बसमधून रोज ७ हजार प्रवासी प्रवास करत होते. नवी मुंबई परिवहन व्यवस्थापनाच्या या निर्णयामुळे हजारो प्रवाशांचे मात्र हाल होणार आहेत. परिवहन पुन्हा बससेवा कधी सुरू करणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

अपघाताच्या पार्श्वभूमीवर निर्णय

उरण मार्गावरील बस बंद करण्याबाबत महानगरपालिकेचे अधिकारी बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत यावर काही तोडगा निघतो का पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, शुक्रवारपासून उरण मार्गावर धावणारी ३० व ३१ नंबरची बससेवा बंद करण्यात येणार आहे. दरम्यान, ९ फेब्रुवारी रोजी नवी मुंबई परिवहनाच्या बसचा अपघात झाला होता. याप्रकरणी बस चालकाविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. एनएमएमटी बसने टेम्पो आणि बाइकला दिलेल्या धडकेनंतर एकाचा मृत्यू झाला होता तर एक गंभीर जखमी झाला होता. गावकऱ्यांनी याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली होती.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल