नवी मुंबई

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर थॉट्स’ पदविका अभ्यासक्रमाचा समावेश; नवी मुंबई महापालिका आणि मुंबई विद्यापीठामध्ये सामंजस्य करार

सामाजिक न्याय दिनाच्या पूर्वसंध्येला नवी मुंबई महानगरपालिका आणि मुंबई विद्यापीठ यांच्यात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर थॉट्स’ या विषयावर पदव्युत्तर पदवीनंतरचा एक वर्ष कालावधीचा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.

Swapnil S

नवी मुंबई : सामाजिक न्याय दिनाच्या पूर्वसंध्येला नवी मुंबई महानगरपालिका आणि मुंबई विद्यापीठ यांच्यात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर थॉट्स’ या विषयावर पदव्युत्तर पदवीनंतरचा एक वर्ष कालावधीचा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे तेथे सातत्याने होणाऱ्या विविध उपक्रमांमुळे ‘ज्ञानस्मारक’ म्हणून नावाजले जात आहे. या स्मारकातून बाबासाहेबांच्या ग्रंथवाचनाप्रमाणेच युवा अभ्यासकही तयार व्हावेत, या भूमिकेतून नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या संकल्पनेतून ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर थॉट्स’ या विषयावर पदव्युत्तर पदवी नंतरचा एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याबाबतचा सामंजस्य करार न्याय दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबई विद्यापीठाच्या सभागृहात करण्यात आला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त डॉ. कैलास शिंदे तसेच मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

याप्रसंगी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, शहर अभियंता शिरीष आरदवाड, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या विभागप्रमुख उपायुक्त संघरत्ना खिल्लारे, स्मारकाच्या सल्लागार संध्या अंबादे, मुंबई विद्यापीठाचे उपकुलपती प्राचार्य डॉ. अजय भामरे, निबंधक डॉ. प्रकाश कारंडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र मुंबई विद्यापीठाच्या विभागप्रमुख डॉ. मनीषा करणे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

स्मारकाच्या नावलौकिकात अधिकच भर

विद्यापीठाचे निबंधक डॉ. प्रकाश कारंडे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेसोबत झालेला हा सामंजस्य करार विद्यापीठाच्या कामकाजातील सर्वात कमी वेळेत झालेला करार असल्याचे आवर्जून सांगितले. मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऐरोली सेक्टर १५ येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर थॉट्स’ या विषयावर पदव्युत्तर पदवीनंतरचा एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम १ जुलैपासून सुरू होत असून यामुळे स्मारकाच्या नावलौकिकात अधिकच भर पडली आहे.

या स्मारकात सामाजिक न्याय, महिला सक्षमीकरण, कामगारांचे सबलीकरण, बालकांचे हक्क अशाप्रकारे उपक्रम राबविण्याचे नियोजन केले जात आहे. हा पदविका अभ्यासक्रम हे याच उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने उचललेले एक यशस्वी पाऊल आहे.

- डॉ. कैलास शिंदे , आयुक्त नवी मुंबई मनपा

हा पदविका अभ्यासक्रम ही एक सुरुवात असून यापुढील काळात सामाजिक न्याय, पालीभाषा व अशा प्रकारचे इतरही अभ्यासक्रम याठिकाणी सुरू करण्यात येणार आहेत. लवकरच स्मारकामध्ये मुंबई विद्यापीठाच्या सहयोगाने संशोधन केंद्र सुरू करण्याचा मनोदय आहे.

- डॉ. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू मुंबई विद्यापीठ

अमरावतीत मोठी कारवाई! लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयाजच्या घरावर बुलडोझर; अनधिकृत बांधकाम पाडले, VIDEO

Navi Mumbai : हापूस आंबा झाला स्वस्त; APMCमध्ये दरात घट, १५००रुपयांपासून पेटी उपलब्ध

चहाच्या टपरीवर रेल्वे कर्मचारी कोसळला; ३ मिनिटे तडफडल्यानंतर मृत्यू, घटना CCTV मध्ये कैद

वेदांता पॉवर प्लांट स्फोटातील मृतांचा आकडा वाढला; मॅनेजमेंटविरूद्ध FIR नोंदवा, न्यायालयीन चौकशी करा - काँग्रेसची मागणी

Mumbai : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मुंबादेवी मंदिरात आंबा महोत्सव; भक्तांसाठी खास सोहळा