नवी मुंबई

नवी मुंबई विमानतळावर शिवाजी महाराजांचा पुतळा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; अनेक मान्यवरांची उपस्थिती

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-१ परिसरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.

Swapnil S

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-१ परिसरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अलौकिक नेतृत्वाला, पराक्रमाला आणि दैदिप्यमान वारशाला अभिवादन करणारा हा पुतळा महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक ठरणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, महिला व बालविकास मंत्री अदिती सुनील तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी भूमिपुत्र स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे वरिष्ठ अधिकारी तसेच इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (NMIAL) यांच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या या स्मारकात ८ फूट उंच चबुतऱ्यावर १२ फूट उंचीचा कांस्य धातूचा अर्धपुतळा (बस्ट) उभारण्यात आला आहे.

नवी मुंबईतील 'आकार आर्ट अँड स्कल्पचर' चे शिल्पकार नितीन रोहिदास गोर्डे यांनी हा पुतळा साकारला असून, महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयाने मान्यता दिलेल्या प्रारूपानुसार कॉपर अलॉय ब्राँझ (तांबे मिश्रित कांस्य) धातूमध्ये त्याची निर्मिती करण्यात आली आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे प्रमुख आकर्षण

सुमारे आठ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण झालेली ही भव्य कलाकृती नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. तसेच देश-विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना महाराष्ट्राच्या इतिहासाची, संस्कृतीची आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याची ओळख करून देणारे हे एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक केंद्र म्हणून विकसित होणार आहे. विमानतळाच्या आधुनिक वास्तुरचनेसह महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वैभवाची सांगड घालणारा हा पुतळा नवी मुंबईच्या सांस्कृतिक ओळखीमध्ये मोलाची भर घालणारा ठरणार असल्याची भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

समान नागरी कायदा २१ राज्यांत लागू होईल; अमित शहा यांचा विश्वास

Monsoon Update : गणेश आगमनाला पावसाचीही हजेरी; आज वादळी वाऱ्याचा अंदाज

BRICS Summit 2026 : अप्रत्यक्षपणे चीनला फटकारले; क्रिटिकल मिनरल्सचा शस्त्र म्हणून वापर नको - पंतप्रधान मोदी

Mumbai : दादर-वडाळ्यात धडक कारवाई; १६३ बेकायदा बांधकामे हटवली, पालिकेच्या एफ-उत्तर विभागाची कारवाई

पोलिसांचा नकार! जरांगेंच्या मुंबई आंदोलनाला परवानगी नाही; द्वेषबुद्धीचा निर्णय, उपोषण होणारच - मनोज जरांगे