सिडकोचा पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटीसह गृहनिर्माणावर भर; १६,२५० कोटींचा अर्थसंकल्प सादर X - @CIDCO_Ltd
नवी मुंबई

Navi Mumbai : सिडकोचा पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटीसह गृहनिर्माणावर भर; १६,२५० कोटींचा अर्थसंकल्प सादर

राज्यातील सर्वात श्रीमंत आणि नफ्यातील महामंडळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाने (सिडको) सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी १६,२५० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. सर्वसामान्यांपासून उच्चभ्रू नागरिकांपर्यंत सर्व घटकांचा विचार करून विविध योजना आखण्यात आल्या असून पायाभूत सुविधा, परवडणारी घरे आणि कनेक्टिव्हिटी यावर विशेष भर देण्यात आल्याचा दावा सिडकोकडून करण्यात आला आहे.

Swapnil S

नवी मुंबई : राज्यातील सर्वात श्रीमंत आणि नफ्यातील महामंडळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाने (सिडको) सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी १६,२५० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. सर्वसामान्यांपासून उच्चभ्रू नागरिकांपर्यंत सर्व घटकांचा विचार करून विविध योजना आखण्यात आल्या असून पायाभूत सुविधा, परवडणारी घरे आणि कनेक्टिव्हिटी यावर विशेष भर देण्यात आल्याचा दावा सिडकोकडून करण्यात आला आहे.

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा आढावा घेताना सिडकोने ९,७७४.२३ कोटी रुपयांचे सुधारित उत्पन्न आणि ९,७७०.२६ कोटी रुपयांचा खर्च नोंदवला असून ३.९७ कोटी रुपयांचा अधिशेष साध्य केल्याचे जाहीर करण्यात आले. मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची अंमलबजावणी करतानाही आर्थिक शिस्त राखल्यामुळे हे शक्य झाल्याचे सिडकोने म्हटले आहे. सन २०२६-२७ साठी १६,२५० कोटी रुपयांचे उत्पन्न आणि १६,१५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून १०० कोटी रुपयांचा अधिशेष अपेक्षित आहे. प्रस्तावित एज्युसिटीमध्ये जगातील अग्रगण्य विद्यापीठांचा समावेश असणार असून, मेडिसिटीद्वारे आंतरराष्ट्रीय आरोग्यसेवा व संशोधन केंद्र उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याशिवाय सिडकोकडून ६,५२१ कोटी रुपये खर्चाच्या २५.३ किमी लांबीच्या ठाणे-एनएमआयए उन्नत मार्गाची अंमलबजावणी सुरू असून, यामुळे प्रवासाचा वेळ ९० मिनिटांवरून ३० मिनिटांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.

मेट्रो, कॉर्पोरेट पार्क आणि मनोरंजन प्रकल्प

सिडकोकडून मेट्रो विस्तार, एज्युसिटी, मेडिसिटी, लॉजिस्टिक्स हब, विमानतळ-आधारित विकास आणि जलद कनेक्टिव्हिटी यांवरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्याचबरोबर २०,००० आसनक्षमतेचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे इनडोअर मनोरंजन केंद्र, खारघर व्हॅली गोल्फ कोर्सचे १८-होल चॅम्पियनशिप सुविधेत रूपांतर, ‘वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट’ अंतर्गत युनिटी मॉल,खारघरमध्ये १५५ हेक्टरचे आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्क अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचाही समावेश अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.

मेट्रो लाईन ८ ला गती

सिडकोने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) जोडणाऱ्या ३४.८९ किमी लांबीच्या मेट्रो लाईन ८ प्रकल्पाला गती दिली आहे. या मार्गावर दररोज सुमारे ९.८ लाख प्रवासी प्रवास करतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. तसेच लाईन १ए (बेलापूर-एनएमआयए) आणि लाईन २ (पेंढार-एनएमआयए) या विस्तार योजनाही नियोजन टप्प्यात आहेत.

सन २०२६-२७ साठीचा सिडकोचा अर्थसंकल्प पायाभूत सुविधा, दळणवळण आणि दर्जेदार गृहनिर्माणावर भर देणारा आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, एरोसिटी, एज्युसिटी, मेडिसिटी, मेट्रो लाईन ८ व लाईन २, आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्क आणि इतर विकास उपक्रमांमुळे नवी मुंबई प्रमुख आर्थिक व गुंतवणूक केंद्र म्हणून उदयास येणार आहे.
विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको

गृहनिर्माण उपक्रम

सिडकोकडून नेहमीच परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीला प्राधान्य देण्यात आले आहे. सन २५-२६ या आर्थिक वर्षात महामंडळाने १६,८७६ सदनिकांची गृहनिर्माण योजना जाहीर केली होती, ज्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या यशाच्या पायावर पुढे जात, सन २६-२७ मध्ये सुमारे १९,३०० सदनिकांची नवीन गृहनिर्माण योजना सिडकोकडून राबविण्याचे नियोजन आहे. सिडकोने स्पष्ट केले आहे की, एकात्मिक पायाभूत सुविधा विकास, शाश्वत शहरी नियोजन आणि नागरिक-केंद्रित विकास यांवर आधारित धोरण कायम ठेवत नवी मुंबईला देशातील सर्वात प्रगत आणि नियोजित शहरांपैकी एक म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न पुढेही सुरू राहील.

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत रंगत वाढली; शेवटच्या दिवशी ६ उमेदवारांची माघार; काँग्रेसचे आकाश मोरे मैदानात ठाम

Puducherry Assembly Elections 2026 : मतदान केंद्रावर साडीतील रोबोट! पुदुच्चेरीत 'निला'कडून मतदारांचे स्वागत; VIDEO व्हायरल

Mumbai : ३१ मे पर्यंत १०० टक्के नालेसफाई पूर्ण करा! पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे निर्देश

भोंदू अशोक खरात प्रकरण : अश्लील व्हिडिओ व्हायरल करणे महागात, गुन्हा दाखल

बीकेसी पॉड टॅक्सी प्रकल्पावर तज्ज्ञांनी ओढले ताशेरे; नियोजनाचा अभाव, वाढीव भाड्यामुळे प्रकल्पाच्या व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह