नवी मुंबई : महापे उड्डाणपुलाखाली वाहतूक नियमन करत असताना क्रेनखाली येऊन महापे वाहतूक शाखेतील पोलीस हवालदार गणेश पाटील यांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना गुरुवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घडली.
गणेश पाटील हे वाहतूक नियंत्रणासाठी महापे वाहतूक शाखेसमोरील चौकात उभे असताना, रबाळे एमआयडीसीहून तुर्भेच्या दिशेने जाणाऱ्या क्रेनने निष्काळजीपणे धडक दिली. धडकेनंतर पाटील क्रेनच्या चाकाखाली सापडले आणि गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ वाशीतील महापालिकेच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
अपघातानंतर महापे वाहतूक पोलिसांनी क्रेनचालक राजेश गौंड याला तातडीने ताब्यात घेतले. तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर पोलीस दलात तीव्र संताप व दुःख व्यक्त होत आहे. ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलीस संघटनांकडून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य ती सुरक्षा व्यवस्था आणि नियमांचे काटेकोर पालन करण्याची मागणी करण्यात येत आहे.