नवी मुंबई : मोबाइल चोरीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शासनाने चेअर (CHER - सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर) हे पोर्टल सुरू केले. मोबाइल चोरीच्या तपासात हे पोर्टल महत्त्वाचे ठरत आहे. मात्र हे पोर्टल आल्याने पोलिसांनी मोबाइल चोराचा तपास बंद केल्यात जमा आहे. याच पोर्टलचा दाखला देत चोरी गेलेल्या किंवा हिसकावून घेतलेल्या मोबाइलबाबत गुन्हे नोंद करण्यास टाळाटाळ केली जात आहे.
गुन्हा नोंद केला काय किंवा नाही काय मोबईल चोरीचा तपास याच पद्धतीने केला जातो. असे मखलाशी पोलीस करत आहेत. मात्र त्यामुळे वर्षाला किमान दोन- अडीच हजारांपेक्षा जास्त गुन्हे नोंद होत नाही. त्याहून धक्कादायक या पोर्टलमध्ये किती मोबाइल चोरीची नोंद झाली याची एकत्रित नोंद ठेवली जात नसल्याने मोबाइल चोरीचा तपास राम भरोसे, अशी अवस्था झाली आहे.
मोबाइल चोरीच्या प्रमाणात प्रचंड वाढ होत असताना तपास मात्र होत नसल्याची ओरड ही नित्याचीच आहे. शासनाने मोबाइल चोरीचे वाढते प्रकार लक्षात घेता चोराच्या शोधासाठी चेअर (CHER- सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर) हे पोर्टल सुरू केले. मोबाइल चोरी झाल्यावर या पोर्टलमध्ये मोबाइल ईएमआय क्रमांक मोबाइल सिम क्रमांक आदी माहिती भरावी लागते. त्यानंतर जर चोरी झालेल्या मोबाइल मध्ये दुसऱ्याने त्याचे नावाचे सिम कार्ड टाकताच त्याची माहिती मोबाइल मालक आणि पोलिसांना मिळते आणि पोलीस मोबाइल जप्त करतात. अशा प्रकारे नवी मुंबई पोलिसांनी २०२४ या वर्षात १ हजार ८४ मोबाइलचा शोध लावत मोबाइल जप्त करून मूळ मालकांना दिले आहेत. अशी माहिती वार्षिक पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली. मात्र याच पोर्टलमध्ये किती मोबाइलची नोंद झाली याची माहिती देण्यात आली नाही.
नवी मुंबईत दिवसाला किमान आठ ते दहा मोबाइल चोरीला जातात, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. मोबाइल चोरीला गेला असला तरीही त्याची नोंद ‘हरवलेली वस्तू’ या शीर्षकाखाली केली जाते.
गुन्हे नोंद न करण्यावर भर
२०२४ मध्ये ७ हजार ३६९ एकूण गुन्ह्यांची नोंद झाली त्या पैकी ५ हजार ६७७ गुन्हे उघडकीस आले. अर्थात २०२४ मध्ये गुन्हे उकल होण्याचे प्रमाण ७७ टक्के असल्याचे सांगत पोलिसांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली, मात्र मोबाइल चोरी गुन्ह्याची नोंद करण्यात आली असती तर याच गुन्हे उकल टक्केवारीत मोठी घसरण झाली असती, अशी माहिती एका पोलीस कर्मचाऱ्याने दिली.