नवी मुंबई

नवी मुंबई विमानतळावर लढाऊ विमानाचे यशस्वी लँडिग; एअरपोर्ट कधी होणार सुरू?

Swapnil S

नवी मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची यशस्वी चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पार पडली. हवाई दलाचे 'सी-२९५' हे लढाऊ विमान धावपट्टीवर यशस्वीपणे उतरविण्यात आले. त्यानंतर वॉटर कॅननद्वारे सलामी देण्यात आली. याबरोबरच 'सुखोई ३०' विमानानेही यशस्वी फ्लायपास्ट केले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम आता जवळपास अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी करण्यात आली. या चाचणीनंतर 'सुखाई ३०' या लढाऊ विमानाने फ्लायपास्ट केला. या विमानतळावर लँडिंग करणाऱ्या 'सी-२९५' या विमानाच्या वैमानिकाचा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

महत्त्वाचा टप्पा पूर्ण, मार्च २०२५ मध्ये नियमित प्रवासी सेवेसाठी सुरू - मुख्यमंत्री शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आजचा दिवस इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. विमानतळाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. विजयादशमीच्या एक दिवस आधी झालेल्या या कार्यक्रमामुळे सर्वसामान्य नागरिक आणि प्रवाशांसाठी हा मोठा आनंदाचा क्षण आहे. मार्च २०२५ मध्ये हे विमानतळ नियमित प्रवासी सेवेसाठी सुरू होईल, वेळेआधीच काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. सिडकोने केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल सर्व टीमचे शिंदे यांनी अभिनंदन केले. हे विमानतळ सर्वसामान्यांसाठी मोठे सोयीचे ठरेल. यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीला आणखी वेग येईल, असे ते म्हणाले. या विमानतळामुळे हजारो रोजगाराच्या संधी निर्माण होतील. आयटी पार्क आणि व्यावसायिक केंद्र उभारली जातील, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

प्रवाशांसाठी फायदेशीर प्रकल्प - फडणवीस

नवी मुंबई विमानतळावरून दरवर्षी अंदाजे ९ कोटी प्रवासी प्रवास करतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे शिवडी- न्हावाशेवा सी-लिंक, मुंबई तसेच नवी मुंबई मेट्रो व दोन खाडीमागनि जोडला जात असून तो देशातील एक विशेष प्रकल्प ठरणार आहे.

दरम्यान, यावेळी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट, खासदार श्रीरंग बारणे, सुनील तटकरे, डॉ. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, आमदार गणेश नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी, अप्पर मुख्य सचिव इक्बालसिंह चहल (गृह), सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, विभागीय आयुक्त डॉ. देशमुख, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त