नवी मुंबई : पर्यावरणप्रेमी आणि लोकप्रतिनिधींच्या निषेध विरोधानंतर गुरुवारी अखेर लोटस तलावातील भरावाचे काम थांबवण्यात आले आहे. ठेकेदारांनी भराव करण्यासाठी आणलेले पोकलेन यंत्र तसेच इतर वाहने माघारी नेल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मात्र दुसऱ्याच दिवशी या तलावात भराव टाकण्यासाठी सिडकोने नेरूळ पोलीस ठाण्याकडे संरक्षण मागितल्याचे पत्र दिवसभर समाज माध्यमातून फिरत असल्याचे दिसून आले.
मात्र याबाबत सिडकोच्या प्रतिनिधींनी मौन बाळगले असल्याचे दिसून येत आहे. नवी मुंबईतील नेरूळ सेक्टर २८ भूखंड क्रमांक २ येथील पाणथळ तलाव असून त्याला लोटस म्हणून ओळखले जाते. याच तलावात प्रचंड मोठ्या प्रमाणात भराव टाकण्यात येत होता.
या लोटस तलावात सिडकोने भराव टाकण्याची परवानगी मे. ठाकूर इन्फ्रा (टीआयपीएल) या ठेकेदार कंपनीला दिली होती. मागील दोन दिवस पर्यावरणप्रेमी, नागरिक, स्थानिक नगरसेवक यांच्या विरोधाला न जुमानता ठेकेदाराने भराव करण्याचे काम सुरू ठेवले होते. परंतु लोकप्रतिनिधी व पर्यावरणप्रेमी यांच्या विरोधामुळे अखेर भरावाचे काम थांबवले आहे. परंतु तरीदेखील टीआयपीएल कंपनीने लोटस तलावात जवळजवळ १०० डंपर भराव टाकला आहे.
उच्च न्यायालयाने लोटस संरक्षित पाणथळ तलावाचे संवर्धन करण्याचे आदेशित केलेले असताना लोटस तलाव बुजवण्याचा सिडकोचा प्रयत्न होता, परंतु तो सफल झाला नाही. लोटस तलाव संरक्षित करण्यासाठीचा अंतिम निर्णय झालेला नसल्याने या पाणथळ तलाव वाचवण्यासाठी सातत्याने आवाज उठवणार असल्याचा विश्वास नागरिकांनी व पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केला आहे.
जमीन भूमाफियांच्या घशात घालण्याचा डाव
या ठिकाणी भराव टाकण्यासाठी संरक्षण मागितल्याचे पत्र समाज माध्यमात फिरत असून असे पत्र आम्हाला प्राप्त झाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली तर याप्रकरणी अनेकदा प्रयत्न करूनही सिडको प्रतिनिधींशी संपर्क न झाल्याने प्रतिक्रिया मिळू शकली नाही. हा तलाव बुजवून सिडको भूमाफियांची मदत करीत आहे. जर भराव टाकला तर जमीन भूमाफियांच्या घशात घालण्याचा डाव सिडको अधिकाऱ्यांचा असल्याचा आरोप सिडकोवर होत आहेत.