मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची भूमिका ठाम ठेवत मनोज जरांगे पाटील आणि आंदोलनकर्ते मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. राज्यभरातून लाखो लोकांनी त्यांना पाठींबा दिला असून अनेकजण या आंदोलनात सहभागी होताना दिसत आहेत. शुक्रवारी (दि, २९) आझाद मैदानावर मनोज जरांगे बेमुदत आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. त्यांचा ताफा लवकरच मुंबईत पोहचणार आहे. ते नवी मुंबई मार्गे मुंबईत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण होऊ नये यासाठी नवी मुंबई पोलिसांनी वाहतुकीच्या मार्गात काही बदल केले आहेत.
'हे' मार्ग राहणार बंद
वाहतूक पोलिस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी बुधवारी जारी केलेल्या आदेशानुसार, काही मार्ग बंद करण्यात आले असून पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मराठा आंदोलकांचा मोठा ताफा लक्षात घेता त्यांच्यासाठी पळस्पे गव्हाणफाटा-पामबीच मार्गे वाशी हा मार्ग राखीव ठेवण्यात आला आहे. तर, या काळात लोणावळा-खोपोली मार्गे येणाऱ्या आणि रायगड जिल्ह्यातील खालापूर-शेडुंग मार्गे येणाऱ्या इतर वाहनांना पनवेल शहर आणि कळंबोली परिसरातील महामार्गावर प्रवेश बंद असणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील कोनफाटा तसेच बोर्ले टोलनाका ते पळस्पे फाटा मार्गावर देखील बंदी राहणार आहे. पळस्पे फाटा ते डि-पॉईंट जेएनपीटी मार्ग आणि गव्हाण फाटा ते किल्ला जंक्शन मार्ग आंदोलनादरम्यान अवजड वाहनांसाठी बंद राहणार आहेत. तसेच वाशी प्लाझा आणि वाशी रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या वाहतुकीवर बंदी असेल.
'या' पर्यायी मार्गांचा वापर करा
जेएनपीटी मार्गावरील हलकी व दुचाकी वाहने कळंबोली सर्कलमार्गे पनवेल-शीव महामार्गावरून किंवा साईगाव, दिघोडे, चिरनेर मार्ग वापरून जातील. वाशीला जाणारी हलकी वाहने पनवेल-शीव महामार्गे सानपाडा रेल्वेस्थानकाजवळील सेवा मार्ग वापरून पोहोचू शकतील.
पोलिसांनी स्पष्ट केले आहे की हे निर्बंध फक्त आंदोलनाच्या वेळी लागू होतील. आपत्कालीन सेवा, रुग्णवाहिका, अग्निशमन व जीवनावश्यक सेवा वाहनांना सूट असेल. वाहनचालकांनी गर्दी व अडचणी टाळण्यासाठी पोलिसांनी सुचवलेल्या पर्यायी मार्गांचा अवश्य वापर करावा, असे आवाहन नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी केले आहे.