नवी मुंबई

घरांसाठी गिरणी कामगार १४ फेब्रुवारीला मंत्रालयावर धडकणार

महाराष्ट्रातून हजारो गिरणी कामगार सदर मोर्चात सहभागी होणार आहेत. या मोर्चासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कामगार नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम उपस्थित राहणार आहेत

Swapnil S

नवी मुंबई : गेली २३ वर्ष गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न प्रलंबित आहे. या प्रलंबित प्रश्नावर हजारो गिरणी कामगारांनी आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानुसार १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता गिरणी कामगार आझाद मैदान आणि सीएसटी येथे एकत्रित येऊन मंत्रालयावर धडक मोर्चाने जाणार आहेत.

कामगार लढत आहेत; मात्र सरकार आश्वासनाशिवाय काहीच करत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २१ ऑगस्ट २०२३ रोजीच्या बैठकीत जमीन आणि घरे देण्यासाठी दिलेले आदेश सर्वच संबंधित खात्यातील अधिकाऱ्यांनी गुंडाळून ठेवले आहेत. मालक आणि विकासक यांना गिरण्यांच्या जमिनी कायदा करुन हस्तांतरित करण्यात आल्या. त्यावर मोठमोठे टॉवर उभे राहिले. परंतु, कायदा असून देखील गिरणी कामगारांना घरे मिळत नाहीत. हेच कामगारांचे हे दुर्दैव आहे.

महाराष्ट्रातून हजारो गिरणी कामगार सदर मोर्चात सहभागी होणार आहेत. या मोर्चासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कामगार नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम उपस्थित राहणार आहेत, असे ‘गिरणी कामगार संघर्ष समिती'चे अध्यक्ष प्रवीण घाग, सरचिटणीस प्रवीण येरुणकर यांनी सांगितले. याप्रसंगी ॲड. गायत्री सिंग, मीना मेनन, कॉ. घाग, ॲड. विनोद शेट्टी, सामाजिक कार्यकर्ते जगदीश नलावडे, सुहास बने, मारुती विश्वासराव, आदि उपस्थितीत राहणार आहेत.

दरम्यान, गिरणी कामगारांच्या या ज्वलंत मागण्यासाठी मुंबई आणि महाराष्ट्रातील काना-कोपऱ्यातूनसर्व गिरणी कामगारांनी आवर्जुन उपस्थित राहुन सदर मोर्चा यशस्वी करावा, असे आवाहन प्रवीण घाग यांनी केले आहे.

सत्याच्या मोर्चात असत्याचाच बोलबाला

नोव्हेंबर महिना कसा जाईल? बघा तूळ आणि वृश्चिक राशीचे भविष्य

ठाणे स्थानकाच्या विस्तारीकरणाला प्रारंभ; १५ डब्यांच्या लोकलसाठी फलाटांची लांबी वाढविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

“२० वर्षांपासूनचं स्वप्न अखेर साकार; तुम्ही फक्त वर्ल्डकप नव्हे, तर..."; विश्वविजेत्या भारतीय संघासाठी मिताली राजची इमोशनल पोस्ट

इतिहास रचला! भारताच्या महिला क्रिकेटपटूंनी प्रथमच विश्वचषक जिंकला; दक्षिण आफ्रिकेला चारली धूळ