‘दि. बा. पाटील’ नावावरून प्रकल्पग्रस्तांत असंतोष; नवी मुंबई विमानतळ उद्घाटनावेळी जल्लोषासोबतच निदर्शने 
नवी मुंबई

‘दि. बा. पाटील’ नावावरून प्रकल्पग्रस्तांत असंतोष; नवी मुंबई विमानतळ उद्घाटनावेळी जल्लोषासोबतच निदर्शने

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिल्या विमानाने झेप घेतल्यानंतर संपूर्ण शहरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. मात्र या ऐतिहासिक क्षणाला गालबोट लागले ते विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव न दिल्याने एकीकडे जल्लोष सुरू असतानाच, दुसरीकडे प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र असंतोष दिसून आला.

Swapnil S

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिल्या विमानाने झेप घेतल्यानंतर संपूर्ण शहरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. मात्र या ऐतिहासिक क्षणाला गालबोट लागले ते विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव न दिल्याने एकीकडे जल्लोष सुरू असतानाच, दुसरीकडे प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र असंतोष दिसून आला.

गुरुवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत विमानसेवेचा प्रारंभ झाला. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी अनेक मान्यवर, प्रवासी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. मात्र विमानतळाच्या नामकरणाबाबत पूर्वी दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्याने प्रकल्पग्रस्तांनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री यांनी नुकतेच माध्यमांशी बोलताना विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात येईल, असे पुन्हा एकदा स्पष्ट केले होते. तरीही उद्घाटनाच्या दिवशी नावाची घोषणा न झाल्याने प्रकल्पग्रस्तांचे समाधान झाले नाही.

या पार्श्वभूमीवर काही प्रकल्पग्रस्तांनी विमानतळ परिसरात, कडक पोलीस बंदोबस्तात, दि. बा. पाटील यांच्या नावाच्या घोषणा देत निषेध नोंदवला. या विमानतळावरून पहिल्या उड्डाणाने प्रवास करणारे ठाणे जिल्ह्याचे माजी खासदार संजीव नाईक यांनीही मुख्यमंत्री यांचे आभार मानताना, विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव दिले असते, तर हा आनंद द्विगुणित झाला असता, अशी प्रतिक्रिया दिली.

यावेळी दि. बा. पाटील यांचे कुटुंबीयही प्रवाशांसोबत त्यांच्या छायाचित्रांसह उपस्थित होते. सरकारने ठरल्याप्रमाणे नाव दिले असते, तर अधिक समाधान वाटले असते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, उद्घाटनानंतर काही तासांतच शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील, काँग्रेसचे पदाधिकारी सुदाम पाटील यांच्यासह समर्थकांनी करंजाडे येथील काळभैरव मंदिरासमोर निषेध आंदोलन केले. सरकारसाठी हा सुवर्णदिन असला, तरी दि. बा. पाटील यांना आदर्श मानणाऱ्यांसाठी हा काळा दिवस आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. विमानतळाच्या पूर्व बाजूकडील मार्गावर दि. बा. पाटील यांच्या समर्थनार्थ फलकबाजीही करण्यात आली.

जोपर्यंत विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव दिले जात नाही, तोपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला असून, गरज पडल्यास ‘मुंबई जाम’ करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे.

पुण्याच्या राजकारणात मोठी घडामोड! प्रशांत जगताप यांनी धरला काँग्रेसचा 'हात', पक्षाची ताकद वाढणार?

अवघ्या १० वर्षांच्या श्रवण सिंगला राष्ट्रपतींच्या हस्ते 'प्रधानमंत्री बाल पुरस्कार'; म्हणाला, "मला स्वप्नातदेखील...

"रुग्णालयानेच त्याला मारले": कॅनडामधील भारतीय व्यक्तीच्या पत्नीने सांगितला ८ तासांचा भयावह अनुभव

पेट्रोल पंपांमध्ये भारत जगात तिसरा! संख्या १ लाखांवर, १० वर्षांत दुप्पट वाढ; टॉप २ देश कोणते?

Mumbai: शौचालय वापराचेही प्रमाणपत्र द्यावे लागणार; इच्छुकांची धावपळ सुरू