नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (NMIA) ८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. उद्घाटनानंतर अवघ्या दोन दिवसांतच विमानतळाच्या रस्त्यावर पहिला अपघात घडला. शुक्रवारी (दि. १०) दुपारी ४ वाजता तीन वाहनांची भीषण धडक झाली. NMIA च्या नव्या रस्त्यावर अजूनही काम सुरू आहे. तसेच, या रस्त्यावर गतिरोधक नसल्याने भरधाव येणाऱ्या दोन कार आणि एक टेम्पो एकमेकांवर आदळले.
प्राथमिक माहितीनुसार, पनवेल शहरातून विमानतळाच्या दिशेने वेगाने जाणारी एक कार समोरून येणाऱ्या टेम्पोवर जोरात धडकली. धडक एवढी जबर होती की टेम्पोचा तोल जाऊन तो उलटला, तर कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला. त्याच वेळी मागून येणाऱ्या भरधाव वेगातील कार या दोन वाहनांना धडकली.
अपघाताची तीव्रता मोठी असली तरी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. टेम्पो चालकाला किरकोळ दुखापत झाली असून काम करत असलेले मजूर आणि स्थानिकांच्या मदतीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अपघाताचा आवाज इतका मोठा होता की काही अंतरावर असलेल्या मजूर आणि इतर लोकांना धक्का बसला.
वाहतूक ठप्प
अपघातानंतर उलटलेला टेम्पो आणि नुकसानग्रस्त कार रस्त्यात अडथळा बनल्याने वाहतूक जवळपास एक तास विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जड यंत्रणेच्या मदतीने वाहने बाजूला केली आणि वाहतूक सुरळीत केली.
स्थानिक पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून प्राथमिक तपासात अतिवेग आणि निष्काळजीपणा हे अपघाताचे प्रमुख कारण असल्याचं समोर आलं आहे. चालकांकडून वाहन चालवताना नियमांचे उल्लंघन झाले का, हेही तपासले जात आहे.
नव्या रस्त्यावर सुरक्षा प्रश्न
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाशी जोडणारा हा रस्ता नुकताच सुरु करण्यात आला आहे. त्यावर ही पहिली मोठी दुर्घटना घडल्याने रस्ते सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. विमानतळ प्रकल्पाशी संबंधित जड वाहनांची आणि बांधकाम सामग्री वाहतुकीची मोठी रहदारी या मार्गावर असते. त्यामुळे स्थानिकांनी या मार्गावर स्पीड ब्रेकर, चेतावणी फलक आणि अधिक पोलीस बंदोबस्त वाढवण्याची मागणी केली आहे.
पनवेल पोलिसांनी वाहनचालकांना आवाहन केले आहे की, "हा रस्ता सरळ आणि रुंद असला तरी अद्याप काही ठिकाणी कामं सुरू आहेत. त्यामुळे वेगमर्यादेत वाहन चालवणं आणि सिग्नलचे पालन करणं अत्यावश्यक आहे."