नवी मुंबई : सिडकोत लाचखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. गेल्या ११ वर्षांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सिडकोत २१ वेळा केलेल्या कारवाईत एकूण ११ अधिकारी-कर्मचाऱ्यांना जाळ्यात पकडले. त्यात सिडकोत प्रतिनियुक्तीवर आलेल्या ७ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, तर उर्वरित ४ कर्मचारी सिडकोचे आहेत.
एसीबीने केलेल्या २१ पैकी ७ कारवाया यंदाच्या वर्षातीलच आहेत. लाचखोरीच्या वाढत्या प्रकारांमुळे सिडकोतील भ्रष्टाचाराची साखळी अधिकच उघडी पडत आहे. विशेष म्हणजे सिडकोतील हौसिंग सोसायटीसह निबंधक कार्यालय व भूमी अभिलेख कार्यालय (टीएलआर) या दोन विभागांमध्ये सर्वाधिक एसीबीच्या कारवाया झाल्याने या विभागातील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यामुळे लाचखोरीला आळा घालण्यासाठी सिडकोच्या दक्षता विभागाने कंबर कसली आहे.
चार दिवसांपूर्वीच सिडकोच्या ‘नयना’ विभागात एसीबीने मोठी कारवाई करत दोन जणांना ६ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. ‘नयना’ विभागातील टीएलआर विभागात टीपीएस स्कीमअंतर्गत शेतकऱ्यांच्या जमीन मोजणीची कामे केली जातात. मात्र या विभागातील अधिकारी व कर्मचारी सिडकोच्या अधिकृत कामांव्यतिरिक्त खाजगी लोकांची टीपीएस क्षेत्राबाहेरील कामे लपूनछपून करत असल्याचे एसीबीच्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांनी १९ नोव्हेंबर रोजीच ‘नयना’ विभागाला भेट देत लाचखोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला होता. तरीही काही दिवसांतच एसीबीची मोठी कारवाई झाल्याने प्रशासनाच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. भ्रष्टाचारमुक्त सिडकोसाठी केवळ पत्रव्यवहार नव्हे तर कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाईची गरज असल्याचे स्पष्ट होत आहे.
भ्रष्टाचाऱ्यांना कठोर शासन झालेच पाहिजे
एसीबीकडून सातत्याने होणाऱ्या कारवायानंतरही कर्मचारी सुधारत नसल्याचे दिसत आहे. लाच घेणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कायद्याने कठोर शासन झालेच पाहिजे आणि अशा घटना घडू नयेत यासाठी अधिक दक्षता आवश्यक आहे, असे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांनी स्पष्ट केले. लाचखोरी पासून अधिकारी-कर्मचाऱ्यांना परावृत्त करण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृतीपर अभियान राबविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
दक्षता विभागाकडून अनेकदा समज
२४ जून रोजी मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांनी सिडकोतील सर्व विभागांना लाचखोरी करू नये, असे पत्र पाठवले होते. त्यानंतर ११ सप्टेंबर रोजी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनीही सर्व विभागांना लाचखोरी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. गेल्या काही महिन्यांत मुख्य दक्षता अधिकाऱ्यांनी १२० वेळा विविध विभागांना भेटी देत ४० ठिकाणी अचानक भेटी देऊन अधिकारी-कर्मचाऱ्यांना धारेवर धरले होते.