नवी मुंबई

Navi Mumbai : बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी पती-पत्नीवर गुन्हा; सिडकोच्या अधिकाऱ्याचा प्रताप; ACB च्या चौकशीत उघड

सिडकोतील बोगस कर्मचारी वेतन घोटाळ्यातील मुख्य आरोपी सागर मदनलालजी तपाडिया याने आपल्या पदाचा गैरवापर करुन पत्नीच्या नावावर कोट्यवधी रुपयांची अवैध मालमत्ता जमा केल्याचे लाच लुचपत प्रतिबंधक ब्युरोने केलेल्या तपासात उघड झाले आहे.

Krantee V. Kale

नवी मुंबई : सिडकोतील बोगस कर्मचारी वेतन घोटाळ्यातील मुख्य आरोपी सागर मदनलालजी तपाडिया याने आपल्या पदाचा गैरवापर करुन पत्नीच्या नावावर कोट्यवधी रुपयांची अवैध मालमत्ता जमा केल्याचे लाच लुचपत प्रतिबंधक ब्युरोने केलेल्या तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी नवी मुंबई एसीबीने तपाडिया आणि त्याची पत्नी मनिषा तपाडीया या दोघांविरोधात खारघर पोलीस ठाण्यात अपसंपदा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

सिडकोत वर्ग-१ चा अधिकारी असलेल्या सागर तपाडिया हा सन २०१९ मध्ये पनवेल येथील सिडको नोडल कार्यालयात सहायक वसाहत अधिकारी पदावर कार्यरत होता. त्यावेळी त्याला लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

त्यानंतर सन २०२१ मध्ये सागर तपाडीया हा सहाय्यक कार्मिक अधिकारी म्हणुन रुजू झाल्यानंतर २०२३ मध्ये त्याने सिडकोच्या सेवेत २९ बोगस कर्मचारी कार्यरत असल्याचे दाखवून त्यांच्या नावे सुमारे ३ कोटी रुपयांची रक्कम परस्पर हडप केली होती. त्यामुळे सागर तपाडीया विरोधात सिडकोने गुन्हा दाखल करुन त्याला बडतर्फ केले आहे.

दरम्यान, सागर तपाडिया याच्या मालमत्तेची उघड चौकशी करण्याचे आदेश प्राफ्त झाल्यानंतर एसीबीने त्यांच्या परिक्षण कालावधीतील उत्पन्न आणि खर्चाची तपासणी केली. या चौकशीत तपाडीया याचे एकूण कायदेशीर उत्पन्न १ कोटी १२ लाख रुपये असताना, त्याच्याकडे तब्बल ३ कोटी ६ लाख ६५ हजार रुपयांची मालमत्ता असल्याचे आढळून आले. यावरुन तपाडीया याने त्याच्या कायदेशीर उत्पन्नापेक्षा तब्बल १ कोटी ९४ लाख ४७ हजार ९०५ रुपये इतकी अधिकची अपसंपदा मिळवल्याचे निष्पन्न झाले. कायदेशीर उत्पन्नाच्या तुलनेत ही मालमत्ता १७३.३६ टक्के अधिक असल्याचे चौकशीत आढळुन आले आहे.

सागर मदनलालजी तपाडीया याने ही अवैध मालमत्ता स्वतच्या आणि पत्नी मनिषा तपाडीयाच्या नावे खरेदी केल्याचे आढळुन आले आहे.

मनिषा तपाडीया हिने ही संपत्ती स्वतःच्या नावे बाळगून पतीला बेकायदेशीररीत्या मालमत्ता जमवण्यासाठी प्रोत्साहन दिल्याने, नवी मुंबई एसीबीचे पोलीस उप अधीक्षक धर्मराज सोनके व त्यांच्या पथकाने तपाडीया पती पत्नीविरोधात खारघर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम १३(१)(ब), १३(२) आणि १२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

मुस्लिम आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान; राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे हायकोर्टाचे आदेश

आसामचे मुख्यमंत्री सर्वाधिक भ्रष्ट - राहुल गांधी; मोदी, शहा, सरमा यांचे आसाममध्ये लँड एटीएम, काँग्रेसची टीका

निवडणूक रद्द करण्याचा भाजपचा डाव - ममता बॅनर्जी; बंगालमध्ये सरकारी अधिकाऱ्यांना घेराव, ‘तृणमूल’च्या मदतनीस कंपनीवर पुन्हा छापे

Mumbai : गॅस तुटवड्याने बेस्टची उपाहारगृहे बंद; कामगारांवर उपासमारीची वेळ

Iran vs US-Israel War : इराणच्या अध्यक्षांचे अमेरिकेतील नागरिकांना खुले पत्र; अनेक सवाल केले उपस्थित