नवी मुंबई : नवी मुंबई शहरात थंडीमुळे आणि वायू प्रदूषणामुळे हवेतील धुरके (SMOG) वाढले असून ते नियंत्रणात ठेवण्यासाठी सतर्कता राखत ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. शहरात सुरू असलेल्या बांधकाम साईट्सवर धूळ प्रतिबंधात्मक उपाययोजना काटेकोरपणे राबविल्या जात आहेत का, याची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि त्रुटी आढळल्यास संबंधित बांधकाम साईट आठवडाभरासाठी बंद करावी, असेही त्यांनी सांगितले. याकरिता नगररचना विभाग व विभाग कार्यालयातील अभियंत्यांनी आपल्या क्षेत्रातील बांधकाम साईट्सची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल जलद सादर करावा, असे निर्देश दिले.
नवी मुंबईच्या पर्यावरणाकडे विशेष लक्ष देण्याच्या दृष्टीने वायू प्रदूषणावर प्रतिबंध आणण्यासाठी बांधकाम साईट, दगड खाणी, सिमेंट निर्मितीचे आरएमसी प्लांट याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे व त्यासोबतच वाहनांमुळे होणारे प्रदूषण, तंदूर भट्ट्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठीही प्रयत्न करावेत, असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीदरम्यान दिले.
हा पानगळतीचा ऋतू असल्याने पानांचा कचरा गोळा करून त्याचे जाळणे कोणत्याही परिस्थितीत होऊ नये, याची दक्षता घ्यावी. तसेच हरित कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी उद्यानातील चारही कोपऱ्यात कंपोस्ट पिट असावीत, असेही आयुक्त डॉ. शिंदे यांनी निर्देश दिले.
माती साफ प्रक्रिया दर पंधरा दिवसांनी राबवावी
सध्या वारा कमी असल्याने हवेत धुरक्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्य रहदारीचे रस्ते आणि एमआयडीसी क्षेत्रातील रस्त्यांच्या कडेला असलेली माती वाहनांच्या वेगामुळे हवेत उडून धूळ वाढते, हे लक्षात घेऊन ती साफ करून उचलून नेण्यासाठी धडक मोहीम राबवावी. रस्त्यांच्या कडेची ही माती साफ करण्याची प्रक्रिया दर पंधरा दिवसांनी राबविण्याचेसुद्धा आदेश आयुक्तांनी दिले.
कोळशाचा वापर प्रतिबंधित करावा
कॉरी साईट्स व सिमेंट निर्मितीचे आरएमसी प्लांट येथे प्रदूषण प्रतिबंधाच्या नियमांचे पालन होते आहे की नाही, याची प्रत्यक्ष पाहणी करून खातरजमा करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. त्याचबरोबर बेकरीमध्ये कोळशाचा वापर होत असल्यास तो त्वरित बंद करावा, तंदूरसाठी हॉटेलमध्ये होणारा कोळशाचा वापर प्रतिबंधित करावा आणि कुठेही कचरा जाळला जात असल्यास त्यावर कठोर कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वर्दळीच्या रस्त्यांवर सखोल स्वच्छता मोहीम
वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी रस्त्यांच्या कडेला साचलेली माती व धूळ यांची यंत्रसहित साफसफाई करण्यात येत आहे.या मोहिमेत अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आठही विभागांतील कर्मचारी सक्रिय आहेत. मोहीमेअंतर्गत ठाणे-बेलापूर मार्ग, आम्र मार्ग तसेच एमआयडीसी क्षेत्रातील मुख्य रस्त्यांची स्वच्छता हाती घेतली गेली आहे.
एनकॅपच्या डस्ट सप्रेसर वाहनांचा वापर
हिवाळा कालावधी आणि वायू प्रदुषणामुळे हवेतील धूरक्याचे प्रमाण वाढले आहे. यांत्रिकी वाहन आणि स्प्रिंकलर, जेट स्प्रे वाहनाद्वारे पाणी मारून रस्ते धुतले जात आहेत. वर्दळीच्या चौकांमध्ये एनकॅपच्या डस्ट सप्रेसर (फॉगर्स) वाहनांनी हवेतील धूळ जमिनीत उतरविण्यासाठी पाण्याचे फवारे मारले जात आहेत. विशेष म्हणजे, रस्ते धुण्यासाठी मलप्रक्रिया केंद्रातील शुध्द प्रक्रियाकृत सांडपाणी वापरले जात आहे.
आगामी काळात नियमितपणे ही सखोल स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे.
हिवाळा कालावधी आणि वायू प्रदुषणामुळे हवेतील धूरक्याचे प्रमाण वाढले आहे. यांत्रिकी वाहन आणि स्प्रिंकलर, जेट स्प्रे वाहनाद्वारे पाणी मारून रस्ते धुतले जात आहेत. वर्दळीच्या चौकांमध्ये एनकॅपच्या डस्ट सप्रेसर (फॉगर्स) वाहनांनी हवेतील धूळ जमिनीत उतरविण्यासाठी पाण्याचे फवारे मारले जात आहेत. विशेष म्हणजे, रस्ते धुण्यासाठी मलप्रक्रिया केंद्रातील शुध्द प्रक्रियाकृत सांडपाणी वापरले जात आहे. आगामी काळात नियमितपणे ही सखोल स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे.