नवी मुंबई : पाकिस्तानमधून बियाण्यांच्या टरबुजाच्या आयातीवरील निर्बंध चुकवण्यासाठी दुबईमार्गे भारतात माल आणण्याचा प्रयत्न महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) उधळून लावला. 'ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट' अंतर्गत न्हावा-शेवा बंदरात कारवाई करून सुमारे २५ हजार किलो बियाण्यांचा, २.०२ कोटी रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
डीआरआयला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आयात मालाची तपासणी करण्यात आली. कागदपत्रांमध्ये हा माल संयुक्त अरब अमिरातीमधून (यूएई) आयात केलेल्या खरबुजाच्या बिया असल्याचे दाखवण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात तो टरबुजाच्या बियाण्यांचा साठा असल्याचे स्पष्ट झाले. तपासात या बियाण्यांचे मूळ पाकिस्तान असल्याचे उघड झाले.
पाकिस्तानातील कराची बंदरातून दुबईतील जेबेल अली बंदरात आणि तेथून कंटेनर व जहाज बदलून माल भारतात आणण्यात आल्याचे तपासात समोर आले. मालाचे मूळ लपवण्यासाठी कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा संशय आहे. भारत सरकारने २ मे २०२५ पासून पाकिस्तानमधून थेट किंवा अप्रत्यक्ष आयातीवर निर्बंध घातले आहेत. याप्रकरणी आयातदाराचा मुलगा आणि पुतण्या यांना २२ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली. यापूर्वी आयात केलेल्या बियाण्यांचीही डीआरआय चौकशी करत आहे.