उकाड्यात नवी मुंबईकरांना ताडगोळ्यांचा गारवा; खरेदीसाठी नागरिकांची लगबग, स्थानिकांसह पर्यटकांनाही भुरळ  
नवी मुंबई

उकाड्यात नवी मुंबईकरांना ताडगोळ्यांचा गारवा; खरेदीसाठी नागरिकांची लगबग, स्थानिकांसह पर्यटकांनाही भुरळ

वाढत्या तापमानामुळे नवी मुंबई शहरात उकाड्याची तीव्रता जाणवू लागली आहे. अशा कडक उन्हात शरीराला दिलासा देण्यासाठी नागरिकांचा कल आता नैसर्गिक थंडावा देणाऱ्या ताडगोळ्यांकडे वळताना दिसत आहे.

Swapnil S

शेखर हंप्रस/नवी मुंबई

वाढत्या तापमानामुळे नवी मुंबई शहरात उकाड्याची तीव्रता जाणवू लागली आहे. अशा कडक उन्हात शरीराला दिलासा देण्यासाठी नागरिकांचा कल आता नैसर्गिक थंडावा देणाऱ्या ताडगोळ्यांकडे वळताना दिसत आहे. रस्त्याच्या कडेला झाडांच्या सावलीत बसून रसाळ, गोड ताडगोळे विकणाऱ्या विक्रेत्यांकडे ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा सातत्याने चढत आहे. सकाळपासूनच सूर्याची तीव्रता जाणवत असल्याने नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागत आहे. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी अनेकजण ऊसाचा रस, शहाळे आणि कैरीचे पन्हे यांचा आधार घेत असले तरी सध्या पांढऱ्या शुभ्र, मऊ आणि गोड चवीच्या ताडगोळ्यांनी स्थानिकांसह पर्यटकांनाही भुरळ घातली आहे.

उन्हाचा पारा वाढत असल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी ताडगोळे हा नैसर्गिक पर्याय आहे. पारदर्शक खोबऱ्यासारखे दिसणारे ताडगोळे गोड-तुरट चवीचे असून तहान भागवतात. त्यामुळे ग्राहकांकडून मोठी मागणी आहे. सर्व खर्च वजा जाता दिवसाकाठी ६०० ते ९०० रुपयांपर्यंत नफा होतो. उन्हाळ्याचे हे दोन महिने आमच्या कुटुंबासाठी रोजगाराचे साधन ठरतात.
प्रकाश आगासकर, विक्रेते

आकारानुसार दर बदलतात

नवी मुंबईत ताडफळांची लागवड मर्यादित असली तरी वसई किनारपट्टी, उरण आणि पनवेल परिसरात ताडझाडांची संख्या मोठी आहे. त्यामुळे तेथून ताडफळे आणून विक्री केली जाते. ताडफळ फोडून त्यातील ताजे ताडगोळे ग्राहकांना दिले जातात. सध्या डझनभर ताडगोळ्यांची किंमत ८० ते १२० रुपयांदरम्यान असून आकारानुसार दर बदलत आहेत. या व्यवसायामुळे ग्रामीण भागातील शेतकरी व आदिवासी बांधवांना दोन ते तीन महिन्यांसाठी रोजगार मिळत आहे.

‘आइस ॲपल’ म्हणूनही प्रसिद्ध

ताडगोळे हे शरीराला शीतलता देणारे आणि आरोग्याच्या दृष्टीने लाभदायी असल्यामुळे ‘उन्हाळी फळ’ म्हणून ओळखले जातात. ‘आइस ॲपल’ म्हणूनही प्रसिद्ध असलेले हे फळ मार्च ते जून या कालावधीत मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. जूनमध्ये पावसाळा सुरू होईपर्यंत त्यांची मागणी टिकून असते. त्यामुळे नवी मुंबईतील बेलापूर ते दिघा परिसरात विविध ठिकाणी ताडगोळे विक्रेते दिसून येत आहेत. मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि पर्यटनस्थळांवर या विक्रेत्यांची लगबग वाढली आहे.

Mumbai : रस्त्यांवरची गुन्हेगारी वाढली; चोरी, लुटमारीच्या घटना वाढल्या, पोलिसांकडूनही गुन्ह्यांचा वेगवान तपास

‘मिसिंग लिंक’ नंतर टोल वाढणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

Mumbai : फाईव्ह स्टार हॉटेलवर पालिका मेहेरबान; विमानतळ परिसरातील पार्किंग कमी करणार, हाॅटेलवाल्यांना अधिकची जागा मिळणार  

उल्हासगरमधील बाजारपेठ वाहतूककोंडीमुक्त होणार; ६० फुटी रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव

ठाण्यात नालेसफाईसाठी रोबोटिक पद्धतींचा वापर; गुंतागुंतीच्या, लटकलेल्या विद्युत वाहिन्यांमुळे धोका वाढला