नवी मुंबईवर धोक्याची घंटा; यंदाच्या पावसाळ्यात ११ होल्डिंग पॉंडवर तब्बल ८० टक्के गाळ (Photo-X/@NMMConline)
नवी मुंबई

नवी मुंबईवर धोक्याची घंटा; यंदाच्या पावसाळ्यात ११ होल्डिंग पॉंडवर तब्बल ८० टक्के गाळ

गेल्या वर्षी पावसाळ्याने अपेक्षेपेक्षा लवकर हजेरी लावल्याचा अनुभव लक्षात घेऊन यंदा नवी मुंबई महानगरपालिकेने (मनपा) पूर्वतयारीला सुरुवात केली आहे.

Swapnil S

नवी मुंबई : गेल्या वर्षी पावसाळ्याने अपेक्षेपेक्षा लवकर हजेरी लावल्याचा अनुभव लक्षात घेऊन यंदा नवी मुंबई महानगरपालिकेने (मनपा) पूर्वतयारीला सुरुवात केली आहे. शहरातील नालेसफाई व होल्डिंग पाँड स्वच्छता कामांना गती देण्यात आली असून, गुरुवारी दिघा ते वाशी असा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला. या दौऱ्यात मनपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख व शहर अभियंते उपस्थित होते.

नवी मुंबईतील पावसाचे पाणी साठवण्यासाठी उभारण्यात आलेल्या ११ होल्डिंग पाँडची तब्बल ८० टक्के क्षमता गाळाने भरल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली असून, नागरिकांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. मनपाकडून या होल्डिंग पाँडमधील गाळ काढण्याचे तसेच अधिक क्षमतेचे पंप बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. यासोबतच शहरातील होल्डिंग पाँड आणि नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

नवी मुंबई शहर खाडीत भराव टाकून वसवण्यात आले असल्याने ते समुद्रसपाटीपासून कमी उंचीवर आहे. पावसाळ्यात भरतीचे पाणी शहरात शिरू नये, यासाठी ११ धारण तलाव (होल्डिंग पाँड) उभारण्यात आले होते. मात्र सध्या या पाँडमध्ये ८० टक्के गाळ साचल्याने त्यांच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे आणि पुराचा धोका वाढला आहे. त्यामुळे गाळ उपसण्यासाठी आवश्यक पर्यावरणीय परवानग्यांची पूर्तता करून कामे वेगाने सुरू करण्यात आली आहेत.

महापालिका क्षेत्रातील २८ मोठ्या नाल्यांची स्वच्छता १५ मेपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तसेच रस्त्यांलगतच्या सांडपाणी वाहिन्या, गावठाण, झोपडपट्ट्या आणि इतर भागांतील गटारांची स्वच्छता ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.एमआयडीसी, पीडब्ल्यूडी, सिडको, एमएमआरडीए, एपीएमसी आदी प्राधिकरणांसोबत समन्वय साधण्यासाठी पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येणार असून सर्वांनी आपापल्या क्षेत्रातील पावसाळीपूर्व कामे वेळेत पूर्ण करावीत, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

सर्व कामे एकाचवेळी पूर्ण करण्याचे नियोजन

शहरातील २७ नैसर्गिक नाल्यांची त्यांच्या उगमापासून खाडीपर्यंत सखोल सफाई केली जाणार असून, ही सर्व कामे एकाचवेळी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी मागील महिनाभरापासून नियोजन सुरू असून त्यानुसार कामांना वेग देण्यात आला आहे. गेल्या वर्षी ३१ मे ही कामे पूर्ण करण्याची अंतिम मुदत होती. मात्र मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पावसाला सुरुवात झाल्याने काही प्रमाणात नियोजन विस्कळीत झाले होते.

गेल्या वर्षी काही भागांत पाणी साचण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामागील कारणांचा अभ्यास करून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पाणी उपसा करण्यासाठी १३०० ऐवजी १७०० हॉर्स पॉवर क्षमतेच्या मोटारी बसवण्यात येणार आहेत. सर्व नाल्यांची डीप क्लीनिंग केली जाणार असून, कितीही पाऊस झाला तरी पाण्याचा निचरा तत्काळ होईल यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात येत आहे.
डॉ. कैलास शिंदे, मनपा आयुक्त

Mumbai : सोलर बाकावर मोबाईल चार्जिंग अन् वायफाय; पालिकेच्या उद्यानात उपक्रम

Mumbai : पार्ल्यात उड्डाणपुलाखाली पहिलाच शहरी शेती प्रकल्प; फळभाज्यांची लागवड, शहरी शेती अभ्यास वर्ग भरणार

धर्मांतराचे प्रकार खपवून घेऊ नका! देवेंद्र फडणवीस यांचे पोलिसांना निर्देश

Mumbai : वारसाहक्क वादावर निर्णय घेण्याचा गृहनिर्माण संस्थांना अधिकार नाही! उच्च न्यायालयाने केले स्पष्ट

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ