नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे जागतिक नकाशावर ठळकपणे झळकलेले नवी मुंबई शहर आता करमणुकीच्या क्षेत्रातही आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण करण्याच्या दिशेने पुढे सरसावले आहे. सिडकोच्या माध्यमातून देशातील पहिला आयकॉनिक आणि बहुउद्देशीय मल्टिपर्पज इनडोअर लाइव्ह एंटरटेन्मेंट अरेना उभारण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली असून याबाबतची स्वारस्य अभिव्यक्ती (EOI) निविदा सिडकोने खुल्या केल्या आहेत.
नवी मुंबईतील विमानतळ क्षेत्रालगत उभारण्यात येणारा हा प्रकल्प न्यूयॉर्कच्या ‘मॅडिसन स्क्वेअर गार्डन’ आणि लंडनच्या ‘०२ अरेना’ यांच्या धर्तीवर विकसित केला जाणार आहे. आधुनिक नगररचना, भविष्यवादी तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाच्या सुविधा यांचा संगम असलेला हा देशातील पहिला भव्य इनडोअर अरेना ठरणार आहे. या अरेनामध्ये सुमारे २० हजार प्रेक्षक बसण्याची आणि २५ हजार प्रेक्षक एकाचवेळी उभे राहण्याची क्षमता असेल. आंतरराष्ट्रीय संगीत मैफिली, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक महोत्सव, लाइव्ह शो, अत्याधुनिक सादरीकरणे आणि जागतिक कार्यक्रमांच्या आयोजनासाठी ही सुविधा पूर्णत: सज्ज असेल.
या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती, पर्यटनवृद्धी, नवीन उद्योगांची उभारणी आणि आर्थिक चळवळीला चालना मिळणार असून नवी मुंबई ‘लाइव्ह एंटरटेन्मेंट’ आणि जागतिक कार्यक्रमांचे अग्रणी केंद्र बनण्याची क्षमता प्राप्त करणार आहे. या ऐतिहासिक प्रकल्पामुळे नवी मुंबईच्या विकासप्रवासाला नवी गती मिळत असून शहर ‘थेट करमणूक राजधानी’ बनण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकत आहे.
निविदासाठी ९ ते ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत
सिडकोने या प्रकल्पासाठी उद्योग क्षेत्रातील प्रतिष्ठित भागीदारांसोबत सहकार्य करत जागतिक दर्जाचे ज्ञान आणि ऑपरेशनल कौशल्य भारतात आणण्याचे नियोजन केले आहे. या प्रकल्पाचे ऑनलाइन दस्तऐवज ९ डिसेंबरपासून उपलब्ध असून ३१ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत निविदा सादर करता येणार आहेत. अटल सेतू ट्रान्स-हार्बर लिंक, हायस्पीड रेल्वे, नवी मुंबई मेट्रो, आगामी आंतरराष्ट्रीय विमानतळ, नेरूळ जेट्टी, खारघरमधील फिफा मानकांचे क्रीडा केंद्र, गोल्फ कोर्स, मेडिसिटी, एज्युसिटी व एरोसिटी यांसारख्या पायाभूत सुविधांमुळे नवी मुंबई हे शहर आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांसाठी आदर्श केंद्र ठरणार आहे.
देशातील पहिल्या आयकॉनिक मल्टिपर्पज इनडोअर लाइव्ह एंटरटेन्मेंट अरेना उभारणीसाठी सुरू झालेली प्रक्रिया ही नवी मुंबईसाठी सांस्कृतिक आणि आर्थिक क्रांतीची नांदी आहे. या प्रकल्पातून कलाकार, उद्योजक आणि स्थानिक नागरिकांसाठी व्यापक संधी निर्माण होऊन नवी मुंबईचे जागतिक नकाशावरील स्थान अधिक बळकट होईल.विजय सिंघल, व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष सिडको