मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) जवळपास दोन दशकांच्या प्रतीक्षेनंतर अखेर उद्घाटनाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. २००७ मध्ये घेतलेल्या धोरणात्मक निर्णयापासून या प्रकल्पाने पर्यावरणीय आव्हाने, पुनर्वसनातील अडथळे आणि अभियांत्रिकीतील अनेक टप्पे पार केले आहेत. आता येत्या ३० सप्टेंबर रोजी या विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.
मुंबईतील ३३.५ किमी लांबीच्या कुलाबा-आरे मेट्रो-३ (अक्वा लाईन) प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी मोदी येणार आहेत, त्याचवेळी नवी मुंबई विमातळाचेही उद्घाटन केले जाईल असे समजते. 'हिंदुस्थान टाईम्स'ने सुत्रांच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार, महायुती सरकारने नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन पितृपक्षामुळे पुढे ढकलले होते, कारण हा काळ नवीन सुरुवातीसाठी अशुभ मानला जातो. त्यामुळे हे उद्घाटन ३० सप्टेंबरला, म्हणजेच नवरात्रीच्या शुभ अष्टमी दिवशी करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. दरम्यान, एनएमआयए अधिकाऱ्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला असला तरी, सिडकोमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने उद्घाटन ३० सप्टेंबरलाच होण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट केले.
२००० च्या दशकाच्या अखेरीस मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) एकाच धावपट्टीवर कार्यरत असल्याने त्याची क्षमता मर्यादेवर पोहोचत असल्याचे विमान वाहतूक नियोजकांना जाणवले. २००७ मध्ये केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने नवी मुंबईत नवीन ग्रीनफिल्ड एअरपोर्टला तत्त्वतः मंजुरी दिली. मुंबईवरील ताण कमी करणे व प्रवाशांच्या वाढत्या मागणीला सामोरे जाणे आदी यासाठीची उद्दिष्ट होते. बहु-विमानतळ प्रणाली निर्माण करणे, एआय-आधारित सुरक्षा, बायोमेट्रिक बोर्डिंग, देशातील पहिले १००% ग्रीन विमानतळ आदी या विमानतळाची वैशिष्ट्ये आहेत.
नवी मुंबई विकासाला चालना
काम : जुलैपर्यंत ९४% पूर्ण
क्षेत्रफळ : १,१६० हेक्टर (२,८६६ एकर)
प्रवासी क्षमता : वार्षिक २ कोटी
मालवाहतूक क्षमता : ०.५ दशलक्ष टन
धावपट्ट्या : पहिल्या टप्प्यात एक कार्यरत
डिझाइन : कमळ-प्रेरित टर्मिनल (झाहा हादीद आर्किटेक्ट्स, लंडन)
गुंतवणूक : ₹ १६,७०० कोटी (अंदाजित)