Navi Mumbai : एलपीजी टंचाईमुळे सानपाडा गॅस एजन्सीसमोर नागरिकांची झुंबड; सिलिंडरसाठी लांबच लांब रांगा; Video 
नवी मुंबई

Navi Mumbai : एलपीजी टंचाईमुळे सानपाडा गॅस एजन्सीसमोर नागरिकांची झुंबड; सिलिंडरसाठी लांबच लांब रांगा; Video

नवी मुंबईतील सानपाडा परिसरात एलपीजी सिलिंडर टंचाईमुळे नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसले. गॅस एजन्सीसमोर सिलिंडरसाठी नागरिकांच्या लांब रांगा लागल्या असून मुंबई महानगर प्रदेशात व्यावसायिक एलपीजी सिलिंडर टंचाईचा परिणाम हॉटेल आणि खाद्य व्यवसायावरही होत आहे.

Mayuri Gawade

मुंबई महानगर प्रदेशात व्यावसायिक LPG सिलिंडरची टंचाई वाढत असल्याने नवी मुंबईत नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. गुरुवारी सानपाडा येथील गॅस एजन्सीसमोर सिलिंडरसाठी मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. रिकामे सिलिंडर घेऊन नागरिकांनी एजन्सीसमोर लांबच लांब रांगा लावल्याचे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

सिलिंडर टंचाईचा परिणाम हॉटेल व्यवसायावर

मुंबई महानगर प्रदेशात व्यावसायिक LPG सिलिंडरची कमतरता वाढत असल्याने हॉटेल, रेस्टॉरंट आणि लहान खाद्यव्यवसायांवर मोठा परिणाम होत आहे. असोसिएशन ऑफ हॉटेल्स अँड रेस्टॉरंट्स (AHAR) चे अध्यक्ष विजय शेट्टी यांनी सांगितले की, "मंगळवारी सुमारे १६ हजार रेस्टॉरंट्सपैकी २० टक्के रेस्टॉरंट्स बंद होती. बुधवारी ही संख्या ३५ टक्क्यांपर्यंत पोहोचली. पुढील काही दिवसांत परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते."

गॅस पुरवठा कमी झाल्यामुळे अनेक हॉटेल्सनी त्यांच्या मेनूमधील पदार्थांची संख्या कमी केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबई काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

दरम्यान, LPG टंचाईमुळे नागरिक आणि लहान व्यावसायिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसने केला आहे. भाजप नेतृत्वाखालील सरकार परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचा आरोपही पक्षाने केला.

पक्षाचे प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस यांनी सांगितले की, व्यावसायिक LPG सिलिंडरच्या टंचाईचा परिणाम शहरातील हॉटेल्स, खानावळी आणि रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांवर होत आहे. गॅस पुरवठ्याअभावी मुंबईतील जवळपास २५ टक्के हॉटेल्स बंद पडल्याचा दावा त्यांनी केला.

१३ आणि १४ मार्चला आंदोलन

LPG दरवाढ आणि पुरवठ्यातील टंचाईच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेसने शहरभर आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. १३ आणि १४ मार्च रोजी मुंबईतील सर्व जिल्हे आणि विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलन करणार असल्याचे पक्षाने जाहीर केले आहे.

या आंदोलनातून LPG सिलिंडरचा नियमित पुरवठा, दर कमी करणे आणि सिलिंडरच्या रेशनिंगला पूर्णविराम देण्याची मागणी केली जाणार आहे.

Mumbai : म्हाडा लॉटरीसाठी मुदतवाढ; १४ मेपर्यंत करता येणार अर्ज, जाणून घ्या सविस्तर

प्रोबेशन कालावधी संपल्यानंतर कामावरून काढणे कायदेशीर; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

विधान परिषद निवडणूक : भाजपतर्फे विधान परिषदेसाठी जठार, कोल्हेंना उमेदवारी

पानसरेंच्या पुस्तकावरचा वाद असंवेदनशील - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी मुंबईत वीजपुरवठा विस्कळीत; अनेक ठिकाणी ८ ते १० तास वीज गायब