नवी मुंबई : एमआयडीसी पाणी बिल अपडेट करण्याच्या बहाण्याने एका सायबर चोरट्याने एका नामांकित कंपनीच्या फायनान्स मॅनेजरचा मोबाईल फोन एपीके फाइलद्वारे हॅक करून त्याच्या कंपनीच्या खात्यातून २७ लाख ७० हजार रुपये लंपास केला.
तक्रारदार कामोठे सेक्टर २१ मध्ये राहण्यास असून ते एका खासगी कंपनीत फायनान्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. ८ जानेवारी रोजी दुपारी या मॅनेजरच्या व्हॉट्सॲपवर सायबर चोरट्याने एमआयडीसी पाणी बिल अपडेट या नावाने एपीके फाइल पाठवली. सायबर चोरट्याने एमआयडीसी वॉटर सप्लाय ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगून, या मॅनेजरशी संपर्क साधला. तसेच त्यांना पाठवलेली फाइल ओपन करून कंपनीचे नाव व ग्राहक क्रमांक अपडेट करण्यास सांगितले. अन्यथा पाणीपुरवठा बंद केला जाईल, अशी धमकी दिली.
सायबर चोरट्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मॅनेजरने एपीके फाईल उघडताच त्यांच्या मोबाईलवर बँकेकडून २ लाख ४० हजार रुपये डेबिट होण्याचा ओटीपी आला. दुसऱ्या मोबाईलवरून एकामागोमाग एक असे १४ व्यवहारांचे एसएमएस आले. तसेच त्यांच्या कंपनीच्या एका बँक खात्यातून २६ लाखांची रक्कम तसेच वाशी शाखेतील चालू खात्यातून १ लाख ७० हजार रुपये काढल्याचे त्यांच्या लक्षात आले.
कंपनीच्या खात्यातून पैसे काढून घेण्यात आल्याचे लक्षात येताच मॅनेजरने तत्काळ मोबाईल बंद करून बँकेत धाव घेत खाते बंद केले. तसेच सायबर हेल्पलाइनवर तक्रार नोंदवली. याप्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, व्हॉट्सॲप नंबर, एपीके फाइल, कॉल डिटेल्स व बँक ट्रान्झेक्शनच्या आधारे सायबर पोलिसांकडून तपास सुरू आहे.