Navi Mumbai : कर्ज काढून २ मोबाईल घेतले, मित्र जामीनदार राहिला अन्...; EMI च्या वादातून मैत्रीचा रक्तरंजित शेवट 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
नवी मुंबई

Navi Mumbai : कर्ज काढून २ मोबाईल घेतले, मित्र जामीनदार राहिला अन्...; EMI च्या वादातून मैत्रीचा रक्तरंजित शेवट

नवी मुंबईत मोबाईलचे हप्ते थकवल्याने मित्रांमध्ये वाद झाला. कर्जवसुलीच्या तगाद्यामुळे संतापलेल्या तरुणाने मित्राची हत्या करून मृतदेह झुडपात लपवल्याचा आरोप आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Mayuri Gawade

नवी मुंबई : अनेकदा मोबाईल किंवा इतर महागड्या वस्तू हप्त्यांवर खरेदी करताना मित्राची मदत घेतली जाते. कधी मित्र जामीनदार होतो, तर कधी हप्ते भरण्यासाठी मदत करतो. मात्र, अशाच एका मोबाईल कर्जाच्या वादातून नवी मुंबईत धक्कादायक घटना घडली आहे. मित्राने घेतलेल्या दोन मोबाईलचे हप्ते थकल्याने जामीनदार असलेल्या तरुणाच्या मागे वसुलीचा तगादा लागला. यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि त्यातून एका २३ वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. आरोपीने मृतदेह झुडपात लपवून पळ काढला. या प्रकरणी पोलिसांनी ३० वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

मित्राने घेतले दोन मोबाईल, पण हप्ते थकले

पीटीआयच्या वृत्तानुसार, मृत तरुणाचं नाव प्रतीक दिलीप आंबवले (२३) असून, तो ठाण्यातील कोपरी परिसरात राहत होता. त्याने कर्जावर दोन मोबाईल फोन खरेदी केले होते. या कर्जासाठी पनवेलमध्ये राहणारा त्याचा मित्र प्रतीक मोहन जाधव (३०) जामीनदार होता. मात्र, आंबवलेने मोबाईलचे हप्ते भरले नाहीत. त्यामुळे कर्जवसुली करणाऱ्या एजंटकडून जाधवकडे वारंवार पैशांची मागणी होऊ लागली. याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला होता.

मध्यरात्री भेटले अन् वाद विकोपाला गेला

पोलिसांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, ८ नोव्हेंबर रोजी पहाटे सुमारे १ वाजता दोघांची पनवेल रेल्वे स्थानकावर भेट झाली. त्यानंतर ते शिवकर गावाच्या दिशेने गेले. यावेळी जाधवने थकलेल्या हप्त्यांचा विषय काढला. मोबाईलचं कर्ज न फेडल्यामुळे एजंट आपल्याला त्रास देत असल्याबद्दल त्याने आंबवलेला जाब विचारला. त्यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वादादरम्यान आंबवलेने जाधवला लाथ मारल्याचं आरोपीने पोलिसांना सांगितलं. त्यामुळे संतापलेल्या जाधवने चाकू काढून आंबवलेवर वार केले. या हल्ल्यात आंबवलेचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे.

हत्या करून मृतदेह झुडपात लपवला

हत्येनंतर आरोपीने आंबवलेचा मृतदेह जवळच्या झुडपात लपवला. त्यानंतर रक्ताने माखलेला चाकू मृताच्या काळ्या बॅगेत ठेवून ती शिवकर-ओएनजीसी मार्गावरील पुलाखाली फेकली आणि घटनास्थळावरून पळ काढला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

२२ फोन कॉल्समुळे आरोपीपर्यंत पोहोचले पोलिस

दरम्यान, ९ नोव्हेंबरपासून आंबवले बेपत्ता असल्याने कोपरी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान त्याच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन पनवेल तालुक्यातील उसार्ली गावाजवळ आढळलं. मोबाईल कॉल रेकॉर्ड तपासले असता, जाधवने आंबवलेला तब्बल २२ वेळा फोन केल्याचं समोर आलं. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सोमवारी (दि. १६) जाधवला ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान त्याने गुन्हा कबूल केल्याचं पोलिसांनी सांगितलं.

त्यानंतर पोलिसांनी शिवकर गावातील एका शाळेमागे, नाल्याजवळील झुडपातून कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेतला. नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर तो शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला. नवी मुंबईचे सहाय्यक पोलिस आयुक्त मयूर भुजबळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेल शहर पोलिसांनी आरोपीविरोधात हत्या आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मेट्रो-५ च्या कशेळी डेपोत पहिल्या गाडीचे आगमन; ठाणे-भिवंडी-कल्याणच्या प्रवाशांना मिळणार दिलासा

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; मशिदीत लपलेला दहशतवादी लतीफ भटचा खात्मा

बंगालच्या उपसागरात तिसरे वादळ; ताशी १२० ते १४५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता

SpiceJet Flight Delay : मुंबई विमानतळावर स्पाइसजेटच्या प्रवाशांचा संताप अनावर; १२ तासांपासून खोळंबा - VIDEOS

मालमत्ता कराची वसुली अधिक प्रभावी होणार; व्हॉट्सॲप, गुगल मेसेजचा आधार, ११ लाख मालमत्ताधारकांना वर्षातून चार वेळा संदेश