नवी मुंबई

Instagram वर मैत्री, नंतर अत्याचार करून जबरदस्तीने गर्भपात; Navi Mumbai तील धक्कादायक घटना, तिघांविरोधात गुन्हा

पनवेलमध्ये एका १८ वर्षीय तरुणाने इन्स्टाग्रामवर मैत्री झालेल्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आणि त्यानंतर जबरदस्तीने तिचा गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Swapnil S

नवी मुंबई : पनवेलच्या आदई गावात राहणाऱ्या एका १८ वर्षीय तरुणाने इन्स्टाग्रामवर मैत्री झालेल्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आणि त्यानंतर जबरदस्तीने तिचा गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानुसार खांदेश्वर पोलिसांनी आरोपी बंटी उर्फ यश प्रवीण दिपके या तरुणाविरोधात बलात्कारासह पोक्सोखाली गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात पीडित मुलीचा गर्भपात करण्यास आरोपी बंटीची आई व इतर नातेवाईकांनी मदत केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांना देखील या गुन्ह्यात सहआरोपी केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील १७ वर्षीय पीडित अल्पवयीन मुलगी आणि आरोपी बंटी यांची दोन वर्षापुर्वी इन्स्टाग्रामवरून मैत्री झाली होती. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असूनही आरोपी बंटी याने तिच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण करून तिला लग्नाचे आमिष दाखवले. तसेच पीडित मुलीला आपल्या घरी बोलावून तिच्यासोबत अनेकवेळा शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

त्यामुळे पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर तिने ही बाब बंटीला सांगितली. आरोपी बंटीची आई वैशाली दिपके हिने गत मे महिन्यात पीडित मुलीला बंटीसोबत त्यांच्या मूळ गावी नांदेड येथे पाठवले. येथील एका रुग्णालयात नेऊन तिचा जबरदस्तीने गर्भपात केला. त्यानंतर पीडित मुलीला पुन्हा तिच्या घरी आणुन सोडले.

गत आठवड्यात पीडित मुलीचा गर्भपात झाल्याची माहिती तिच्या आईला समजल्यानंतर पीडित मुलीच्या आईने खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी बंटी व पीडित मुलीला गर्भपात करण्यास भाग पाडणारी त्याची आई वैशाली दिपके आणि अन्य दोन महिला प्रियंका व विशाखा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अद्याप गुन्ह्यात कुणाला अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मुंबईकरांसाठी आनंद वार्ता! वर्षअखेर ५० किमी मेट्रो मार्ग येणार सेवेत; MMRDA चे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांची माहिती

IND Vs ENG: भारतापुढे बरोबरी साधण्याचे आव्हान! आजपासून इंग्लंडविरुद्ध चौथी कसोटी, योग्य संघनिवडीचा गिल-गंभीरसमोर पेच

येऊर परिसरात गटारीला ‘नो एन्ट्री’; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

सोने पुन्हा १ लाखांवर; चांदीचा भाव ३,००० रुपयांनी वाढला

‘मिग-२१’ लढाऊ विमान निवृत्त होणार; ‘उडती शवपेटी’ म्हणून ओळख, १९ सप्टेंबरला एक ‘अध्याय’ संपणार