नवी मुंबई / उरण :
नवीन वर्षाची सुरुवातच नवी मुंबई आणि उरणकरांसाठी अत्यंत चिंताजनक ठरली आहे. सुनियोजित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) थेट ४०७ या ‘धोकादायक’ पातळीवर, तर उरणमध्ये २०२ या ‘खराब’ स्तरावर पोहोचल्याने संपूर्ण परिसर प्रदूषणाच्या तीव्र विळख्यात सापडला आहे. तज्ज्ञांच्या मते, सध्या नवी मुंबईतील हवा श्वासात घेणे म्हणजे दररोज सुमारे ७.३ सिगारेट ओढण्याइतके घातक असून, ही स्थिती केवळ पर्यावरणापुरती मर्यादित न राहता थेट गंभीर सार्वजनिक आरोग्य संकटाचा इशारा देत आहे.
भारतभरातील हवेच्या गुणवत्तेचा रिअल-टाइम मागोवा घेणाऱ्या aqi.in या ओपन-सोर्स प्लॅटफॉर्मनुसार, मंगळवारी मध्यरात्री नवी मुंबईतील AQI २६२ (गंभीर) इतका होता. मात्र अवघ्या आठ तासांत तो झपाट्याने वाढून ४०६-४०७ या धोकादायक स्तरावर पोहोचला. उरणमध्येही बुधवारी वायू गुणवत्ता निर्देशांक २०० च्या पुढे नोंदवला गेला असून, नागरिकांना श्वसनाचे त्रास, डोळ्यांची जळजळ, सर्दी-खोकला यांचा सामना करावा लागत आहे.
याशिवाय, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी संबंधित रस्ते रुंदीकरणाच्या नावाखाली किल्ले गावठाण परिसरात झाडतोडीचे प्रस्ताव आखले जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. या झाडतोडीविरोधात एनआरआय पोलीस ठाण्याजवळील परिसरात ५० झाडे वाचवण्यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे. एकूणच, नवी मुंबई-उरण परिसरातील वाढते वायू प्रदूषण हे आता केवळ आकडेवारीपुरते मर्यादित न राहता थेट नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करत आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून शहर ‘धोकादायक हवेत’ श्वास घेत असल्याने, कठोर अमलबजावणी, हरित क्षेत्रवाढ आणि प्रभावी प्रदूषण नियंत्रणासाठी तातडीने ठोस पावले उचलण्याची जोरदार मागणी सर्व स्तरांतून होत आहे.
पुरेशी हिरवळ नसल्यामुळे अडचणी
वाढत्या काँक्रीटीकरणामुळे तापमानवाढ आणि प्रदूषण अधिक तीव्र होत आहे. ‘उर्वरी’ या ना-नफा संस्थेच्या संस्थापक वसुंधरा गुप्ते यांनी सांगितले की, प्रति रहिवासी किमान तीन झाडे आवश्यक असताना प्रत्यक्षात प्रति रहिवासी अवघे एकच झाड उपलब्ध आहे. पुरेशी हिरवळ नसल्यामुळे प्रदूषण नियंत्रणात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.
रुग्णालयातील आकडेवारीची वाट पाहण्याची गरज नाही. जवळजवळ प्रत्येक घरात सर्दी, खोकला, शिंका आणि घशाचे संसर्ग वाढले आहेत. या गंभीर स्थितीबाबत नॅटकनेक्टने मुख्यमंत्री तसेच नवी मुंबई व पनवेल महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे. नुकत्याच सुरू झालेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांचे स्वागत प्रदूषित हवेद्वारे होणे शहरासाठी भूषणावह नाही.बी. एन. कुमार, संचालक नॅटकनेक्ट फाऊंडेशन
स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर केवळ कागदावरच
पर्यावरण देखरेख संस्था नॅटकनेक्ट फाऊंडेशनच्या माहितीनुसार, अनियंत्रित बांधकामे, अवजड वाहनांची सततची वाहतूक, वाहनांचे उत्सर्जन, औद्योगिक कारखाने आणि रस्त्यांवरील धुळीमुळे संपूर्ण नवी मुंबई-उरण पट्ट्यावर प्रदूषणाचे जाड आवरण पसरले आहे. विशेषतः एनएच-३४८ वरील गव्हाण फाटा ते पनवेल दरम्यान सुरू असलेली दगड खाणींची कामे, क्रशर्स आणि खडी-ग्रीट वाहून नेणारे डंपर कोणत्याही सुरक्षेशिवाय धावत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कामांसाठी ठरवलेल्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर (SOPs) केवळ कागदावरच उरल्या असल्याचे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे.