नवी मुंबई

‘कोल्ड प्ले’कन्सर्टचा जेएनपीएच्या वाहतुकीला फटका

नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये आयोजित केलेल्या ‘कोल्ड प्ले’ या जागतिक दर्जाच्या कन्सर्टमुळे जेएनपीटीतून बाहेर जाणाऱ्या अवजड वाहनाना बंदी घातल्याने वाहतूकदारांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.

राजकुमार भगत

राजकुमार भगत/ उरण

नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये आयोजित केलेल्या ‘कोल्ड प्ले’ या जागतिक दर्जाच्या कन्सर्टमुळे जेएनपीटीतून बाहेर जाणाऱ्या अवजड वाहनाना बंदी घातल्याने वाहतूकदारांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे या ‘कोल्ड प्ले’ कन्सर्टचा आम्हाला भूर्दंड का असा सवाल वाहतूकदारांकडून विचारण्यात येत आहे. या कन्सर्टमुळे रोज हजारो वाहने जेएनपीएच्या आणि परिसरातील रस्त्यावर थांबवून ठेवण्यात येत आहेत.

नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम, नेरूळ येथे ‘कोल्ड प्ले’ या जागतिक दर्जाच्या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे स्टेडियमला कलावंत, महत्त्वाच्या व्यक्ती व प्रेक्षकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व वाहतूककोंडी होऊ नये, याकरीता दिनांक तीन दिवस दुपारी २ ते रात्री १२ वाजेपर्यंत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या ह‌द्दीत सर्व प्रकारच्या जड-अवजड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना शहराच्या सर्व मार्गावरून मार्गस्थ होण्यास, प्रवेश करण्यास आणि वाहने उभी करण्यास पूर्णतः बंदीबाबत पोलीस उपायुक्त (वाहतूक) नवी मुंबई यांनी वाहतूक नियंत्रण अधिसूचना निर्गमित केलेली आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने नवी मुंबई शहरात दहा ते पंधरा हजार अधिकची वाहने येण्याची शक्यता वाहतूक पोलिसांनी वर्तवली होती. वाहनांच्या गर्दीमुळे शहरात वाहतूककोंडी होणार असून त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसला आहे. वाहतूककोंडी टाळण्यासाठी तीन दिवस अवजड वाहनाना नवी मुंबईत प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या वाहतूक बंदीमुळे ज्या ठरलेल्या ट्रीप आहेत, त्या होत नसल्यामुळे जो टाइम लिमिट दिला आहे तो टळून जात असल्यामुळे वाहतूकदारांवर दंड भरण्याची वेळ आली आहे.

शिवाय वाहतुकीची रांग लागते आणि त्यामुळे वाहनांचा मेंटेनन्स वाढतो. त्यामुळे वाहतूकदारांना आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याची वाहतूकदारांची तक्रार आहे. त्यामुळे यातून कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी वाहतूकदारांकडून करण्यात येत आहे. रोज हजारो वाहने अशा प्रकारे रस्त्यावर थांबवून ठेवण्यात येत असल्यामुळे वाहतूकदारांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. शिवाय जेएनपीए या आंतरराष्ट्रीय बंदरातून निर्यात माल वेळेवर पोहचविला जात नसल्यामुळे आणि जेएनपीए बंदरात जहाजे थांबून राहतात. त्यामुळे जहाजांचा वेळ आणि खर्च देखील वाढतो, त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर जेएनपीएची बदनामी होत आहे.

नवी मुंबई किंवा ठाणे येथे कोणताही मोठा कार्यक्रम असला किंवा मोठी व्यक्ती येणार असली तरी जेएनपीएतून जाणारी व येणारी वाहतूक थांबविली जाते. वास्तविक पाहता याचा जेएनपीएच्या वाहतुकीशी काही संबंध नाही. जेएनपीएतील बहुतांश ९५ टक्के ही वाहतूक जेएनपीए परिसरातच होते. त्यामुळे ही वाहतूक थांबविणे म्हणजे निव्वळ आडमुठेपणा आहे. मंगळवारी शेवटचा दिवस असल्यामुळे सकाळपासूनच अवजड वाहनांना थांबवून ठेवण्यात आले आहे, ही वाहतूकदारांची पिळवणूक आहे.

- पंढरीनाथ गांजवे, (वाहतूकदार, रॉयल ट्रान्सपोर्ट)

पोलीस आयुक्तालयाच्या नोटीफिकेशननुसार आम्ही दुपारी २ ते रात्री १२ पर्यंत अवजड वाहनांना बंदी केली आहे. कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा ही वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू करण्यात येईल.

- अतुल दहिफळे,(पोलीस निरिक्षक, उरण वाहतूक शाखा)

GST ५ आणि १८%; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

Maratha Reservation Protest : सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसान भरपाईचे काय? उच्च न्यायालयाचा मराठा आयोजकांना सवाल

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

Mumbai : २३८ एसी लोकल खरेदीला मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४८२६ कोटींची मान्यता

कोकणातून परतणाऱ्या गणेशभक्तांचे हाल; मुंबई-गोवा महामार्गावर ३ किमीपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा