पनवेल : नाकाबंदीवर वाहनांची तपासणी करणाऱ्या पोलिसालाच भरधाव स्विफ्ट डिझायर कारने धडक देऊन तब्बल २०० मीटरपर्यंत फरफटत नेल्याची धक्कादायकघटना मंगळवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास कळंबोलीतील रोडपाली परिसरात घडली.
या घटनेनंतर चालकाने कार न थांबवता आपल्या साथीदारासह घटनास्थळावरून पलायन केले आहे. कळंबोली पोलिसांनी या प्रकरणातील फरार कारचालक आणि त्याच्या सहकाऱ्याविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरु केला आहे. या घटनेत पोलीस कॉन्स्टेबल दिलीप भोई गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर पोलीस कॉन्स्टेबल भोई यांना कारवरून फरफटत घेऊन जातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
सीसीटीव्ही तपास सुरू
या घटनेत भोई गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांना चकवा देऊन कारचालक आणि त्याचा साथीदार पसार झाले. विशेष म्हणजे, संबंधित स्विफ्ट डिझायरकारवर लावलेला क्रमांकही बनावट असल्याचे तपासात समोर आले आहे. कळंबोली पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून, त्यांचा शोध सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याबरोबरच संशयित कारचा माग काढण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. नाकाबंदीवर कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसालाच अशा प्रकारे लक्ष्य करण्यात आल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
कार थांबविलीच नाही
कळंबोली पोलिसांनी मंगळवारी रात्री आपल्या हद्दीतील रोडपाली परिसरात नियमित नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली होती. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने आलेल्या स्विफ्ट डिझायर कारला नाका बंदीवरील पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने कार थांबविण्याऐवजी नाकाबंदीवर तैनात असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल दिलीप भोई यांना जोरदार धडक दिली. या धडकेमुळे भोई कारच्या बोनेटवर पडले. त्यानंतर कार चालकाने कारचा वेग कमी न करता भोई याना कार वरून सुमारे २०० मीटरपर्यंत फरफटत नेले. त्यानंतर कार चालकाने भोई यांना कारच्या बोनेटवरून रस्त्याच्या बाजूला टाकून देत त्याठिकावरून पलायन केले.