नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाचे गेल्या अनेक वर्षांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. येत्या ८ किंवा ९ ऑक्टोबरला या विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तसेच मुंबईतील ‘मेट्रो लाईन-३’च्या शेवटच्या टप्प्याचे व ‘मेट्रो २-बी’चे उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधानांच्या या दौऱ्याची आखणी अंतिम टप्प्यात असून सिडकोसह एमएमआरडीए व्यवस्थापन आपापल्या प्रकल्पांच्या उद्घाटनाच्या तयारीला लागले आहेत. एअर इंडियाने नवी मुंबई विमानतळावरुन एअर इंडिया एक्स्प्रेसची २० उड्डाणे करणार असल्याचे जाहीर केले आहे. देशातील १५ शहरांना या विमानतसेवेद्वारे जोडले जाणार आहे.
दरम्यान, या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशा मागणीचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारला पाठवला असून केंद्राने त्याबाबत अनुकूलता दर्शवल्याचे समजते.
गडचिरोलीत खाणकामाचा आराखडा सादर - मुख्यमंत्री
गडचिरोलीत माइनिंग कॉर्पोरेशनला खाणी देऊन त्याचा योग्य प्रकारे विकास करता येऊ शकतो. त्याबाबतचा आराखडा मी पंतप्रधानांना सादर केला. हे शक्य झाल्यास चीनपेक्षाही स्वस्तात स्टील आपण तयार करू शकतो. याबरोबरच ग्रीन स्टील तयार करण्याचा आराखडा मी पंतप्रधान मोदींसमोर ठेवला आहे. त्यालाही पंतप्रधानांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
३ संरक्षण कॉरिडॉरच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती!
संरक्षण आणि अंतरिक्ष क्षेत्रात महाराष्ट्र हा एक भक्कम भागीदार म्हणून काम करतो आहे. महाराष्ट्रात १० ऑर्डिनन्स फॅक्टरी आहेत. भारताला लागणाऱ्या एकूण शस्त्र आणि दारुगोळ्यापैकी ३० टक्के उत्पादन हे महाराष्ट्रात होते. त्यामुळे महाराष्ट्र हे संरक्षण कॉरिडॉरसाठी प्रभावी क्षेत्र आहे. त्यामुळे महाराष्ट्रात तीन संरक्षण कॉरिडॉरसंदर्भात एक तपशीलवार सादरीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले. यातील पहिला कॉरिडॉर पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, दुसरा कॉरिडॉर अमरावती, वर्धा, नागपूर, सावनेर आणि तिसरा कॉरिडॉर नाशिक-धुळे असा असेल. या तिन्ही कॉरिडॉरच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक राज्यात येणार असून, त्यामुळे मोठा रोजगारसुद्धा निर्माण होईल. राज्य सरकारने यासंदर्भात ६० हजार कोटींचे सामंजस्य करार यापूर्वीच केले आहेत. त्यामुळे या कॉरिडॉरला मान्यता देण्यात यावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली.