नवी मुंबई

डम्परच्या अपघातामुळे सायन - पनवेल महामार्ग चार तास ठप्प

प्रतिनिधी

वाशीहून मुंबईच्या दिशेने जाणारा मालवाहू डम्पर शुक्रवारी सकाळी वाशी खाडी पुलावरील रस्ता दुभाजकवर धडकून दोन्ही बाजूकडील रस्त्यावर आडवा झाल्याने मुंबई-पुणे आणि पुणे-मुंबई या दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे ऐन सकाळच्या वेळेस दोन्ही मार्गावर प्रचंड वाहतूककोंडी होऊन त्यात हजारो वाहने अडकून पडली होती. वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त डम्पर व रस्त्यावर पडलेला माल क्रेनच्या साहाय्याने बाजूला काढून दुपारी १२ वाजताच्या सुमारास दोन्ही मार्गावरून वाहतूक सुरळीत केली. या प्रकारामुळे चार तासांपेक्षा जास्त काळ दोन्ही मार्गावरील वाहतूककोंडीत हजारो वाहने अडकून पडल्याने हजारो प्रवाशांना त्याचा फटका बसला.

या घटनेतील अपघातग्रस्त डम्पर शुक्रवारी सकाळी ५ वाजताच्या सुमारास खडीचा भुगा घेऊन वाशीहून मुंबईच्या दिशेने जात होता. हा डम्पर वाशी खाडी पुलावर आला असताना चालकाचा डोळा लागल्याने त्याचे डम्परवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे सदर डम्पर खाडी पुलावरील रस्ता दुभाजक तोडून दोन्ही रस्त्याच्या मधोमध आडवा झाला. डम्परचा अर्धा भाग मुंबई लेनवर, तर अर्धा भाग पुणे लेनवर अशा स्थितीत उभा राहिल्याने डम्परमधील खडीचा भुगा संपूर्ण रस्त्यावर खाली पडला. त्यामुळे दोन्ही बाजूकडील रस्ता अडवला जाऊन वाहतूक ठप्प झाली.

डम्परचालक किरकोळ जखमी झाल्याने तो घटनास्थळावरून निघून गेला. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त डम्पर बाजूला काढण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, सकाळी ७ वाजल्यानंतर दोन्ही बाजूकडील वाहनात वाढ झाल्यानंतर मुंबई लेनवरील वाहतूककोंडी थेट नेरूळपर्यंत तर पुणे लेनवरील वाहतूक देवनारपर्यंत पोहोचली. या वाहतूककोंडीत दोन्ही मार्गावर हजारो वाहने चार तासांहून अधिक काळ अडकून पडली.

राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीचे परिणाम

आजचे राशिभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

डॉक्टर आत्महत्या प्रकरण : रणजीतसिंह निंबाळकरांवर विरोधकांचा आरोप; मात्र, मुख्यमंत्री फडणवीसांचा पाठिंबा, म्हणाले, "चिंता करू नका...

पाकिस्तानात सलमान खान 'दहशतवादी' घोषित; एका विधानाने 'भाईजान' ठरला अतिरेकी

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट; निलंबित PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण